Breaking
ब्रेकिंग

बेस्टच्या बस प्रवाशांना रणरणत्या उन्हाचे चटक

0 3 9 1 0 5

अक्षराज : मंगेश जाधव

दि.२५ घाटकोपर (मुं. उपनगर) : गेल्या अनेक वर्षापासून पूर्व द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड तसेच ठाण्याकडे जाणाऱ्या बेस्ट बससाठी एक बस स्टॉप आहे. मात्र त्याच्यावर सावलीसाठी शेड नसल्याने ऐन उन्हात प्रवाशांना रणरणत्या उन्हाचे चटके बसत आहेत. तर दुसरीकडे तोंडावर आलेल्या पावसाळ्यातही त्यांची परवड होणार आहे. याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने पालिका आणि एम एम आर डी ए कडे तीन महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार करूनही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे बेस्ट प्रवाशांना उन्हात उभे राहण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांतून व्यक्त होत आहेत. बसस्टॉपच्या ठिकाणी प्रवाशांना बसण्याची सुविधा नाही. तसेच त्या ठिकाणी बस स्टॉपवर कोणतेही शेड नाही.

त्यामुळे खास करून महीला आणि जेष्ठ नागरिकांना उन्हापासून व पावसापासून बचाव करणे अवघड झाले आहे. याबाबत विक्रोळीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश रोकडे यांनी गेल्या २४ जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या एस विभाग कार्यालयाकडे यावर कार्यवाही होण्यासाठी तक्रार केली आहे. त्यात त्यांनी या बस स्टॉपवर पालिकेचा बेस्ट उपक्रम, एम एम आर डी ए यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, त्या ठिकाणी व्यवस्थित बस स्टॉप बनवून दिलेला नाही असे म्हटले आहे. पालिकेला दिलेल्या याच पत्रात म्हटले आहे की, नागरिकांना बसण्यासाठी आणि उन तसेच पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी हा बस स्टॉप संरक्षित करून त्यावर शेड उभारून प्रवाशांना दिलासा द्यावा. मात्र अद्याप याकडे पालिकेचे अथवा एम एम आर डी ए चे लक्षच गेले नसल्याचे तक्रार कर्त्याचे म्हणणे आहे.
दरम्यान, याबाबत गेल्या ३ फेब्रुवारी रोजी एम एम आर डी ए कडून कार्यकारी अभियंता ( रस्ते व वाहतूक) यांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्याच्या नगर विकास विभागाकडून पूर्व द्रुतगती महामार्ग हा २९ नोव्हेंबर २०२२ रोजी या रस्त्याचा विकास, दुरुस्ती, देखभाल तसेच नूतनीकरण आणि विस्तार करण्यासाठी पालिकेकडे कायमस्वरूपी हस्तातंतरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून याबाबत कार्यवाही करावी. मात्र अद्याप या प्रश्नावर पालिका स्तरावर कोणताही निर्णय न झाल्याने प्रवाशांना ऐन उन्हात बसची वाट पाहत स्टॉपवर उभे राहावे लागत आहे. यापुढे तरी याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे