Breaking
नागरी समस्यामहाराष्ट्रमुंबई व कोकण विभाग

मनसेची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक

७ दिवसांत खड्डे बुजवू… सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन…

0 3 9 1 0 4

मनसेची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक

७ दिवसांत खड्डे बुजवू… सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन…

अक्षराज : गणेश भवार

दि.२७ नवी मुंबई : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सायन – पनवेल महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी हैराण झाले आहेत. यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुर्भे येथील कार्यालयावर आज धडक दिली. यावेळी उपस्थित उपविभागीय अभियंता ओमप्रकाश पवार यांना मनसेने धारेवर धरत खड्ड्यांचे छायाचित्रे दाखवून जाब विचारला व यावेळी त्यांना कार्यालयाच्या प्रवेशद्वारा वरील भला मोठा खड्डा दाखवून झोपेचे सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्याला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर मनसेची आक्रमकता पाहून येत्या सात दिवसांत सायन पनवेल महामार्गावरील सर्व खड्डे दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

१२५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सायन – पनवेल महामार्गाची सालाबादप्रमाणे याही वर्षीच्या पावसाळ्यात दुरावस्था झालेली पहावयास मिळत आहे. सदर महामार्गाची “रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता” अशी अवस्था झाली आहे. रस्त्यांवरच्या या मोठ्या खड्ड्यांमुळे कित्येक दुचाकीस्वारांनी आपला जीव गमावला आहे. वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वाहनांचे अपघात या दिवसांत झालेले आहेत. सदरचा महामार्ग हा मुंबई एन्ट्री पॉइंट आणि एक्झिट पॉइंट असल्यामुळे या महामार्गावर सततची वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. आश्चर्याची बाब म्हणजे सदर महामार्गावरील काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत , असे मनसेने यावेळी निदर्शनास आणून दिले. त्यावर उत्तर देताना उपविभागीय अभियंता यांनी पावसाळ्या मध्ये खड्डे भरणे व त्या अनुषंगाने असणारी कामे मे. जे. एम. म्हात्रे या कंत्राटदारास मिळाली असल्याचे सांगितले. त्यांनतर वेळेत सदरचे काम पूर्ण न केल्यामुळे संबंधित कंत्राटदरास काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनसेने केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी सदर कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव दिल्याचे व महामार्गावरील खड्डे पूर्णतः भरून सेवा सुस्थितीत करण्यासाठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आल्याचे स्पष्टीकरण यावेळी मनसेच्या शिष्टमंडळास दिल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

तरी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून या खड्ड्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी व रस्त्यांची डागडुजी अशा प्रकारे करावी जेणेकरून किमान ते दीर्घकाळ टिकतील. येत्या ७ दिवसांत सायन पनवेल महामार्गावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल व निषेध म्हणून पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या आरत्या ओवाळून त्यांना “खड्डे सम्राट” पुरस्कार देण्याचा इशारा गजानन काळे यांनी यावेळी निवेदनातून दिला. याप्रसंगी मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे येत्या सात दिवसांच्या आत महामार्गावरील सर्व खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन उपविभागीय अभियंता यांनी नवी मुंबई मनसे शिष्टमंडळास दिले.

यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहरअध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे , शहर सचिव सचिन कदम, सहसचिव अभिजित देसाई, नितीन लष्कर, रस्ते आस्थापना शहरअध्यक्ष संदीप गलुगडे , पालिका सेना शहरअध्यक्ष आप्पासाहेब कौठुळे, महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष संदेश डोंगरे, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, शहरअध्यक्ष अनिकेत पाटील, मराठी कामगार सेना शहरअध्यक्ष अक्षय भोसले, सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, रोजगार सेना शहरअध्यक्ष सनप्रीत तूर्मेकर, महिला सेना उपशहरअध्यक्ष दिपाली ढऊळ, विभागअध्यक्ष अभिलेश दंडवते, चंद्रकांत मंजुळकर, विद्यार्थी सेना उपशहरअध्यक्ष प्रतिक खेडकर आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे