ठाणे,दि.12 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातंर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा आज निवडणूक विशेष पोलीस निरीक्षक दीपक मिश्रा यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीदरम्यान घेतला. निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून या कर्तव्यात कोणतीही कसूर राहणार नाही. या दृष्टीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूका शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी सतर्क राहण्याचे आदेश देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.
आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विशेष पोलीस निरीक्षक यांनी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
सुरूवातीला ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे, मतदानाची तयारी याबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली. तसेच कोकण विभागातंर्गत इतर जिल्ह्याबाबतही त्यांनी जाणून घेतले.
प्रत्येक जिल्हयात तयार करण्यात आलेल्या कंट्रोल रुमच्या माध्यमातून मतदानाच्या एक दिवस आधी 19 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रियेची अभिरुप चाचणी घेण्यात यावी, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळता येतील. मतदान केंद्रावर मतदानासाठी येणारे उमेदवार हे मतदान झाल्यानंतर मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटर परिसरात रेंगाळणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे श्री.मिश्रा यांनी नमूद केले. मतदान केंद्रावर येणाऱ्या वयोवृद्ध मतदारांसाठी जास्तीत जास्त व्हीलचेअर उपलब्ध करण्यात याव्यात, जेणेकरुन मतदारांना मतदान केंद्रावर ताटकळत उभे रहावे लागणार नाही, यासाठी आपल्या विभागातील रुग्णालय, सेवाभावी संस्थांशी संपर्क साधून व्हीलचेअरची पुरेशी उपलब्धतता प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
एखाद्या मतदान केंद्रावर मशीनमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण होवून मतदान प्रक्रिया थांबली किंवा अन्य काही अडचण उद्भवली तर त्याचे वृत्त हे दिवसभर विविध वाहिन्यांवर दाखवले जाते. त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्यावरसुध्दा ती बातमी तशीच सतत सुरू असते याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती घेवून संबंधित वाहिन्यांशी संपर्क साधून वस्तूस्थिती तात्काळ कळविण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, जेणेकरुन निवडणूक विभागाची बदनामी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही श्री.दीपक मिश्रा यांनी दिली.