मुंब्रातील अनधिकृत बांधकारावरून भाजप आक्रमण
सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात आंदोलन छेडणार
अक्षराज : विनोद वास्कर
दि. २०, मुंब्रा (ठाणे) : मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून गुरुवारी अनधिकृत बांधकामाबाबत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केवळ मुंब्राच नव्हे तर सर्व प्रभाग समिती क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामाबाबत आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.
येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागणार असून राजकीय पक्षांकडून पुन्हा एकदा अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात गुरुवारी अनाधिकृत बांधकामाबाबत आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन करताना मुंब्रा मध्ये कशा पद्धतीने विकास झालेला नाही हे दाखवण्यात आले. मुंब्रात सध्या ३५ ते ४० अनाधिकृत बांधकामे सुरू असून यावर पालिकेच्या अधिकाऱ्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. मुंब्रात पुन्हा एकदा लकी कंपाऊंड करायचे आहे का? असा प्रश्न संजय वाघुले यांनी उपस्थित केला आहे. केवळ मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नव्हे तर संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात अनाधिकृत बांधकामे सुरू असून आता सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा ठाणे भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.