‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’, हरित वारी उपक्रमांतर्गत तयार केलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन
अक्षराज : विकास सरवळे
दि.०६ , पंढरपूर (सोलापूर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’, हरित वारी उपक्रमांतर्गत तयार केलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माझ्यासह मा.आमदार प्रशांत मालक परिचारक,आमदार गोपीचंद पडळकर,आमदार समाधान आवताडे, मा.आमदार राम सातपुते,जिल्हाधिकारी कुंभार आशीर्वाद, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली (भाऊ) हळणवर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या एकात्मिक सनियंत्रण कक्षाद्वारे प्राप्त चित्रीकरणाच्या विश्लेषणातून आषाढी वारीसाठी कालपर्यंत पंढरपूर शहरात सुमारे १४ लाख वारकरी दाखल झाल्याचा अंदाज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत ‘हरित वारी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याच्या संनियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
‘हरित वारी’ उपक्रमांतर्गत दीड लाखावर वृक्षांची लागवड सोलापूर ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रत्येक झाडाला स्वतंत्र क्यूआर कोड दिला जाणार आहे. या माध्यमातून प्रत्येक झाडाची जात, त्या झाडाचे जिओ लोकेशन आणि त्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती उपलब्ध असणार आहे.

ॲपचा वापर करण्याचे प्रशिक्षण ठाणे अंमलदारांना देण्यात आले आहे. हे ॲप ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असल्याने वृक्षारोपण मोहिमेतील विश्वासार्हता, पारदर्शकता आणि डिजिटल ट्रॅकिंग शक्य होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीने विठ्ठल रुख्मिणी देवस्थान समितीला भक्तांच्या सेवेसाठी इलेक्ट्रिक वाहन प्रदान करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनचे भूमिपूजनही करण्यात आले.