कोरेगाव पार्क परिसरात भीषण कार अपघात
दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.०२, पुणे :
कोरेगाव पार्क–बंडगार्डन परिसरात रविवारी पहाटे भीषण कार अपघात झाला असून या दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ भरधाव वेगात असलेली कार नियंत्रण सुटून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली. धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की आसपासच्या रहिवाशांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे हृतिक भंडारे आणि यश भंडारे अशी असून, ते दोघेही पुण्यातील रहिवासी असल्याचे समजते. तर तिसरा मित्र गंभीर जखमी असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासानुसार, वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या भागात रात्रीच्या सुमारास युवकांकडून वाहनांचा बेदरकार वेगात वापर होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघातातील वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले असून, मेट्रोच्या खांबावरही नुकसान झाले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाकडे रात्रीच्या वेळी अधिक गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
या अपघाताने कोरेगाव पार्क परिसर हादरून गेला असून, बेदरकार वाहनचालकत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



