एनडीपीएस प्रकरणातील १७ आरोपींवर मोक्का अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाची पहिली कार्यवाही
अक्षराज : विश्वनाथ शेनोय
दि.१०, कल्याण (ठाणे) : अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात खडकपाडा पोलीस ठाण्याने मोठी कामगिरी केली आहे. एन.डी.पी.एस. प्रकरणातील तब्बल १७ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कार्यवाही करण्यात आली असून, ठाणे पोलीस आयुक्तालयातील ही पहिलीच कारवाई आहे.
खडकपाडा पोलीस ठाणे गु.र.नं. ६३८/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८(क), २०(क), २९ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी विशेष पथकाने आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथून ६२ किलो गांजा, पिस्तुल, २ जिवंत काडतुसे, २ वॉकी-टॉकी संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आजपर्यंतच्या तपासात एकूण ११५ किलो गांजा, २ कार, १ बुलेट मोटारसायकल, १ ऑटो रिक्षा, १ अॅक्टीव्हा, पिस्तुल, काडतुसे, वॉकी-टॉकी असा सुमारे ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित ४ पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे.
तपासातून उघड झाले आहे की, गेल्या ३ वर्षांपासून आरोपी अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करत होते. कल्याण, बदलापूर, सोलापूर, पुणे यासह राज्यातील विविध भागात आणि विशाखापट्टणम परिसरात गांजा विक्रीतून आरोपींनी तरुणाईला व्यसनाधीन केले होते.
मुख्य आरोपी : गुफरान हन्नान शेख (२९, बनेली गाव, टिटवाळा) त्याच्यासह आणखी १६ साथीदारांवर मोक्का लागू करण्यात आला आहे. आरोपींमध्ये बाबर उस्मान शेख (आंबिवली), सुनिल मोहन राठोड (बदलापूर), आझाद अब्दुल शेख (अंबरनाथ), रेश्मा अल्लाउद्दीन शेख (मुंब्रा), शुभम उर्फ सोन्या भंडारी (पुणे), योगेश जोध (सोलापूर) यांच्यासह अन्य आरोपींचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने दि. ३० जुलै २०२५ रोजीच्या गॅझेटद्वारे मोक्का कायद्यात बदल करून अमली पदार्थावरील गुन्हे यात समाविष्ट केले आहेत. त्यानुसारच ही ठाणे आयुक्तालयातील पहिली कारवाई ठरली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०३ अतुल झेडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे करत आहेत.
👉 ठळक मुद्दे…
१७ आरोपींवर मोक्का लागू
११५ किलो गांजा, पिस्तुल, काडतुसे, वाहनांसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाणे पोलीस आयुक्तालयातील मोक्काअंतर्गत पहिली कारवाई
आरोपींनी ३ वर्षांपासून अमली पदार्थ तस्करीचा व्यवसाय सुरू ठेवला होता