जायकवाडी धरणाचे आपत्कालीनसह सर्व २७ दरवाजे उघडले

Spread the love

१ लाख १३ हजार १८४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग; गोदावरी नदीला पुर, गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा

नाशिक जिल्ह्यात व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे धरणात पाण्याची जोरदार आवक झाली. १ लाख १३ हजार १४० क्युसेकने पाण्याची आवक झाल्याने साडे सहा वाजता धरणाचे आपात्कालीन ९ दरवाज्यांसह १८ नियमित दरवाजे असे सर्व २७ दरवाजे साडे चार फुटांनी उचलून १ लाख १३ हजार १८४ क्युसेकने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे पुराचे पाणी नाथसमाधी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोक्षघाटावर आले होते. पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी घाटावर गर्दी केली होती. १० वाजेनंतर आवक विसर्ग टप्प्याटप्प्याने घटविण्यात आला. पुराचे पाणी गोदापात्रातच राहिल्याने पैठण शहरात पाणी शिरले नाही. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

पैठण शहरासह जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे धरणात १ लाख १३ हजार १४० क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाली होती.  यामुळे ९९.८५ टक्के भरलेल्या धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जायकवाडी धरण प्रशासनाने रात्री पाण्याच्या विसर्गात सातत्याने वाढ करीत रविवारी पहाटे धरणाचे आपात्कालीन दरवाज्यासह सर्व २७ दरवाजे साडे चार फुटांने उचलून तब्बल १ लाख १३ हजार १४० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला.  पाण्याचा विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदीला पुर आला होता . पुराचे पाणी गागाभट्ट चौकाजवळ पात्रातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली होती. तर मोक्षघाटाला पाणी टेकले होते. पुरपरिस्थिती गांभीर्य लक्षात घेऊन न.प. मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे व्यंकटी पापुलवार, अभियंता पंकज पवार, सतिष वाळुंज, अशोक पगारे, चंद्रकांत पगारे, अशोक मगरे आदींनी गोदाकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा राहण्याचा इशारा दिला असून पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर न.प. प्रशासनाने बचाव पथक सज्ज ठेवले आहे. धरणात सातत्याने पाण्याची आवक होत असल्याने जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, उप अभियंता श्रध्दा निंबाळकर,, धरण अभियंता मंगेश शेलार, शाखा अभियंता रितेश भोजने, तंत्रज्ञ गणेश खराडकर, अब्दुल बारी गाजी, अप्पासाहेब तुजारे, आबासाहेब गरुड, प्राजक्ता मेसे आदी जलसंपदा विभागाचे अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!