पूर्तता करण्यासंदर्भात आयुक्तांना निवेदन…
अक्षराज : जे. के. पोळ
दि.०८, नेरूळ (नवी मुंबई) : ज्वेल ऑफ नवी मुंबई – लॉर्ड बुद्धा पार्क या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची भव्य अशी मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. नवी मुंबईच नाहीतर जवळपासच्या सर्व परिसरातून या पार्कला भेटी देण्याकरिता अनेक अनुयायी आणि नागरिक येत असतात. परंतु या उद्यानात काही सोयी अपुऱ्या पडत आहेत. त्याकडे महानगरपालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्याकरिता आणि येथील अपुऱ्या सोयी पूर्ण करण्याकरिता आणि समस्यांचे निराकरण करण्याकरिता नवी मुंबई येथील बौद्ध समाज आणि नागरिक यांनी मिळून, एक निवेदन तयार करून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना दिले आहे.

सदर निवेदनात पुढील मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
१) तथागतांच्या मूर्तीवर शोभिवंत छत्रीची व्यवस्था लवकरात लवकर करावी. कारण (फायबर मूर्ती असल्यामुळे गर्मीने मूर्तीला फोडी येत आहेत आणि तडे जात आहेत).
२) मूर्ती चबुतरा या ठिकाणी हत्ती पशु प्राणी व शोभिवंत फुलझाडी देखावा करण्यात यावा.
३) मूर्तीच्या समोर फायबर ट्रान्सफर पत्रा शेडची व्यवस्था करावी, (जेणेकरून साधक समोर बसून ध्यान साधना किंवा छोटे-मोठे कार्यक्रम करतील).
४) मूर्ती शेजारी कायमस्वरूपी स्टेजची व्यवस्था करावी.
५) मूर्तीच्या आसपास सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात यावी.
६) मूर्तीच्या शेजारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
७) बाजूच्या परिसरात सुलभ सौच्छालयाची व्यवस्था करावी.
८) एक खोली त्यात हमेशा १०० / ५० खुर्च्या आणि साऊंड सिस्टम असावे (जेणेकरून कार्यक्रम स्थळी ते घेऊन वापरण्यात येईल.
९) मूर्तीच्या आसपास सदैव सुरक्षा गार्डची नियुक्ती करावी.
१०) मूर्तीची साफसफाई म्हणून एक धम्म सेवकांची नियुक्ती करावी.
११) बौद्ध आंबेडकरी समाजासाठी बेलापूर तालुक्यात भूखंड उपलब्ध करून सुसज्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात यावे.
लॉर्ड बुद्धा पार्क येथील सुशोभीकरण लवकरात लवकर करण्यात येईल व तेथील अपुऱ्या सोयी सुविधा परिपूर्ण केल्या जातील, असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सदर निवेदन स्वीकारताना निवेदकांना दिले.
सदर निवेदन देताना मोठ्या संख्येने अनुयायी व नागरिक उपस्थित होते. विशेषतः लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा बौद्धाचार्य कल्याणराव हनवते, तसेच नेरूळ कामगार युनियन अध्यक्ष कोंडीबा हिंगोले, घर हक्क संघर्ष समिती अध्यक्ष कैलाश सरकटे, चर्मकार समाज संघाचे अध्यक्ष गोविंद वेताळ आणि पंचशील सामाजिक संस्थेच्या महिला अध्यक्षा शालिनीताई औचार यांची प्रमुख उपस्थिती होती.



