टाकळी ढोकेश्वर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन
महिला व बाल विकास विभागाचा पुढाकार
अक्षराज : वसंत रांधवण
दि.१६, अहिल्यानगर : जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील बालकांसाठी बालकल्याण, व्यक्तिमत्त्व विकास, संघभावना, शिस्त व सांस्कृतिक जाणीव वाढविण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागाच्या वतीने पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथिल आदर्श ग्रामीण मंडळ संचलित, नवीन गोकुळ बालसदन येथे शुक्रवार दि. १६ ते रविवार दि. १८ जानेवारी २०२६ या दरम्यान जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. जी. कदम व आदर्श ग्रामीण महिला मंडळ अध्यक्षा मंगल झावरे यांनी दिली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि.१६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ. पंकज आशिया, महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था पुणे,योगेश जवादे, चंद्रशेखर पगारे विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास नाशिक विभाग, माजी न्यायमूर्ती योगेश पैठणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोकुळ बालसदन च्या प्रांगणात करण्यात येणार असून, महोत्सवाचा समारोपाचा कार्यक्रम रविवार दि.१८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता संपन्न होणार आहे. दरम्यान या महोत्सवात जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी बालगृह संस्था अशा एकूण ३८ संस्थांमधील ६ ते १८ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सहभागी बालकांसाठी तीन दिवस विविध क्रीडा, सांस्कृतिक व बौध्दिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवांतर्गत कब्बडी,खो-खो,४०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, कॅरम,गोळाफेक, बुद्धिबळ आदी क्रिडा स्पर्धा तसेच निबंध, हस्ताक्षर, वकृत्व,भाषण, कविता वाचन, चित्रकला, वैयक्तिक व समूह नृत्य, समूहगीत, वैयक्तिक गीत आणि शुद्धलेखन इत्यादी सांस्कृतिक व बौध्दिक स्पर्धेचा समावेश असल्याचेही माहिती महिला व बालविकास अधिकारी संजय कदम व आदर्श ग्रामीण महिला मंडळ अध्यक्षा मंगल झावरे यांनी दिली.



