टाकळी ढोकेश्वर येथे आज तुळजाभवानी पालखी यात्रोत्सव

Spread the love

टाकळी ढोकेश्वर येथे आज तुळजाभवानी पालखी यात्रोत्सव

पालखीची वाजतगाजत गावातून निघणार मिरवणूक

अक्षराज : वसंत रांधवण
दि.१६, पारनेर (अहिल्यानगर) :
सालाबादप्रमाणे यंदाही टाकळी ढोकेश्वर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व कुलदैवत असलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मानाची पालखीचे हनुमान मंदीरात सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी मुक्कामी आगमन झाले.विधिवत पूजा करून देवीच्या पालखीची स्थापना करण्यात आली.


आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी तसेच ग्रामस्थांच्या हस्ते सामुदायिक महाआरती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर मातेची खणा – नारळाने ओटी भरून औक्षण केले जाते. पालखीचे दर्शन आणि यात्रा भरणार आहे. तसेच मंगळवारी सायंकाळी पालखीचे स्वागत, शृंगार, पूजा,आरती होऊन भव्य मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यासाठी यात्रा उत्सव कमेटी कार्यरत झाली असून संपूर्ण गावात पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रात्री उशीर माळकूप व जामगाव येथे मुक्कामी तर दि. १९ रोजी सुपा येथे पालखी यात्रा भरणार आहे. व त्यानंतर पालखी नगर तालुक्यात मार्गस्थ होणार असल्याचे अंबिका (बुऱ्हाणगर )देवस्थानचे पुजारी भगत यांनी सांगितले.
शेकडो वर्षांपासून अनन्यसाधारण महत्त्व असलेली ऐतिहासिक अशी मानाची पालखीची परंपरा भगत कुटुंब अविरतपणे मोठ्या उत्साहात जोपासत आहे.
या कालावधीत भाविकांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन टाकळी ढोकेश्वर यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष माजी सरपंच शिवाजी खिलारी व टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थ यांनी केले आहे.

गावात देवाची पालखी येणार असल्याची भावना अनेकांची मनोकामना पूर्ण होत असल्याने नवसाला पावणारी पालखी म्हणून ख्याती आहे. अशा या सोहळ्याचे आयोजन टाकळी ढोकेश्वर गावत गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. गावात मानाची पालखी येणार असल्याने सर्व देवी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पालखीचे दर्शनासाठी पालखीला स्पर्श करण्यासाठी शेकडो भाविक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. ज्यांच्या नशिबी दर्शनाचे भाग्य असते, त्यांचाच हात पालखीला लागू शकतो,असे म्हटले जाते. साक्षात तुळजाभवानी सूक्ष्म रूपाने आपल्या गावात पालखी मिरवली जाणार असल्याची भाविकांची भावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!