दिवाळी उत्सवात कायदा व सुव्यवस्थेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त
अक्षराज : विश्वनाथ शेनोय
दि.२०, डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली परिसरात पोलीस आयुक्त परिमंडल-०३ चे आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची मोठी गर्दी, बाजारपेठांतील हालचाली आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन हा विशेष बंदोबस्त राबविण्यात आला आहे. डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष हेमाडे यांनी माहिती देताना सांगितले की, “सणाच्या काळात नागरिकांनी शांततेत आणि सुरक्षिततेत दिवाळी साजरी करावी, यासाठी पोलीस सतर्क आहेत.
गर्दीच्या ठिकाणी तसेच प्रमुख चौकांवर अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.”
तसेच वाहतूक नियंत्रण, फटाक्यांच्या विक्रीवरील देखरेख आणि रात्रीच्या गस्तीचे प्रमाण वाढविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी नियमांचे पालन करावे आणि कुठल्याही संशयास्पद हालचालीची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी.



