नमुंमपा पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पारितोषिक विजेत्या मंडळांचा सन्मान
अक्षराज : जे.के.पोळ
दि.१८, नवी मुंबई :
हवामानात व पर्जन्यमानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचे परिणाम आपण सारेजण अनुभवत आहोत, हे सुरळीत करण्यासाठी निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याकडे प्रत्येकानेच काटेकोर लक्ष देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव आपण आनंदात व उत्साहात साजरा करतानाच निसर्गाचे भान ठेवून पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या गतवर्षीच्या नवी मुंबई महानगर पालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२४’ च्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर रेवती कैलास शिंदे तसेच अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे, समाजविकास उपआयुक्त किसनराव पलांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, अति.शहर अभियंता अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व स्मिता काळे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, क्रीडा व सांस्कृतिक विभाग उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गतवर्षीच्या स्पर्धेचे परीक्षक कलाध्यापक राजेश अहिरे यांनी गणेशोत्सवासारख्या अत्यंत महत्वाच्या उत्सवात मंडळे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत समाजासमोर चांगला आदर्श ठेवत असल्याबद्दल कौतुक केले. यावर्षी मागील वर्षीपेक्षा मोठ्या संख्येने मंडळे पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गतवर्षीच्या ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२४’ मधील सर्वप्रथम क्रमांकाने विजेते सेक्टर १७ कोपरखैरणे येथील मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा निकेतन गणेशोत्सव मंडळास रू.२५ हजार आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. सर्वच विजेत्या मंडळांना रक्कमेच्या पारितोषिकासह स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आली. सेक्टर १० नेरूळ येथील नवयुग उत्सव मित्र मंडळ हे द्वितीय तसेच सेक्टर २० तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळ तुर्भे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती से.२०, नेरूळ आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर १७ वाशी या दोन मंडळांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविली. इकोफ्रेंडली श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणाऱ्या सेक्टर ८ वाशी येथील युवा गणेश उत्सव मंडळास विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच प्लास्टिकमुक्त पर्यावरणशील सजावट करणारे सेक्टर ४ घणसोली येथील शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळासही विशेष पारितोषिकाने सन्मानीत करण्यात आले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून नमुंमपा मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये आयोजित सुप्रसिध्द गायक मंगेश बोरगांवकर यांच्या ‘भक्तिरंग’ या अभंग व भक्तीगीत स्वरयात्रेनंतर पारितोषिक वितरण समारंभ झालेल्या गणेशोत्सव मंडळाचे उपस्थित पदाधिकारीही स्वरसंध्येत उत्साहाने सहभागी झाले होते.