“नशेच्या अड्ड्यातून उभी ठाकलेली गुन्हेगारी, पोलिस ठाण्यातच वसुलीचा धंदा!”
“गांजा, दारू, बटन गोळ्या…; येरवडा गुन्हेगारीचा बनला अड्डा !”
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.१५, पुणे (येरवडा) :
येरवड्यातील लक्ष्मीनगर आर.के. चौक परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकी व कोयत्यांच्या मारामारीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुन्हेगारांनी उघडपणे कोयते हवेत फिरवत दहशत माजवली, तर काही दिवसांपूर्वीच एका महिलेला आणि मुलाला घरात घुसून तलवारीने मारहाण करून माफी मागायला भाग पाडण्यात आलं होतं.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, गांजा, बटन गोळ्या, नशिले पदार्थ आणि अवैध दारू विक्रीमुळे गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. येरवडा परिसर आता नशेच्या अड्ड्यांमध्ये बदलला असून, पोलिस मात्र हातावर हात धरून बसले आहेत.
पोलिस आयुक्तांनी स्वतः आदेश दिले होते – “सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करा.”
पण हे आदेश आता कागदावरच राहिले आहेत! कारण येरवडा पोलीस ठाण्यातील प्रवीण खाटमोडे आणि अमोल गायकवाड या दोन कर्मचाऱ्यांनी वसुली आणि गुन्हेगारांशी संगनमत ठेवल्याचा गंभीर आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवीण खाटमोडे स्वतः वसुली करत नसल्याचा दिखावा करतो, पण रामवाडी परिसरातील दोन तरुणांना फक्त हफ्ता वसुलीसाठी कामाला ठेवले आहे.
पोलिस आयुक्तांच्या आदेशाला या वसुलीवाल्यांनी थेट केराची टोपली दाखवली आहे.
आता मात्र एकच प्रश्न सर्वांच्या मनात
“या पोलिस वसुलीवाल्यांविरुद्ध पोलीस आयुक्त नेमकं कोणतं पाऊल उचलणार?”
येरवडा परिसरातील नागरिकांचे लक्ष आता थेट आयुक्त कार्यालयाकडे खिळले आहे.