जनतेची दिशाभूल की राजकीय तयारी? – खाकी फ्लेक्समागचं सत्य काय?
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि. २९, येरवडा (पुणे) : शहरातील येरवडा परिसरात अलीकडेच लावण्यात आलेल्या एका भव्य होर्डिंगमुळे पुणेकरांमध्ये संभ्रम आणि संतापाची लाट उसळली आहे. यात एक व्यक्ती खाकी गणवेशात झळकत असून, “YES… WE CAN DO IT!” अशा घोषणांसह वाहतूक सुधारणा, अमली पदार्थ निर्मूलन आणि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासारख्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. बॅनरवर दिसणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे भानुप्रताप बर्गे, हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र, नागरिक आणि कायदेतज्ज्ञ यांच्यामते हा प्रकार केवळ प्रचाराचा भाग नसून दिशाभूल करणारा आणि कायद्याच्या सीमारेषेवरचा गंभीर प्रकार आहे. कारण, खाकी गणवेशात स्वतःचा फोटो झळकवून एखाद्या सेवेतील अधिकाऱ्याप्रमाणे स्वतःचे सादरीकरण करणे, हे केवळ अनैतिकच नव्हे तर दंडनीय गुन्ह्याच्या श्रेणीत येऊ शकते.
सरकारी पदाचा खोटा भास निर्माण करणं किंवा अधिकृत पोशाखाचा गैरवापर करणं हे गुन्हा मानलं जातं. यातून हे स्पष्ट होते की, निवृत्त अधिकाऱ्याने खाकीचा अशा प्रकारे प्रचारात वापर करणं म्हणजे कायद्याचं उल्लंघन असल्याचा ठपका ठेवता येऊ शकतो.

या फ्लेक्समध्ये भानुप्रताप बर्गे यांनी स्वतःला “शहर सुरक्षित करणार”, “सायबर क्राईम रोखणार”, “अमली पदार्थांपासून मुक्ती मिळवणार” अशा वाक्यांतून पुणे शहरासाठी दिशा ठरवणारा एकमेव नायक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रश्न असा आहे की, निवृत्तीनंतर कोणती जबाबदारी, कोणती वैधानिक पदं किंवा कोणते अधिकार या गोष्टी जाहीरपणे बोलण्याचा हक्क देतात?
ही बाब आणखी गंभीर ठरते जेव्हा आपण पाहतो की, या फ्लेक्सबाबत पुणे पोलिस प्रशासन, PMC किंवा सायबर विभागाकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. त्यामुळे, या बॅनरला अधिकृत परवानगी होती का? की हा फक्त स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी केला गेलेला एक खाकी प्रपोगंडा होता? हे प्रश्न निर्माण होत आहेत.
पुण्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हा प्रकार म्हणजे निवृत्त अधिकाऱ्याचा खाकीचा ‘ब्रँडिंग’साठी वापर आहे. जर अशी परवानगी न घेता बॅनर लावणे कायदेशीर असेल, तर उद्या कोणीही वर्दी घालून समाजात फसवणूक करू शकेल,” अशी घणाघाती टीका एका कार्यकर्त्याने केली.
या प्रकारामुळे पोलीस खात्याची प्रतिमा गडद होत असून, वास्तविक सेवेतील अधिकारी, त्यांच्या कामाची विश्वासार्हता आणि पोलीस दलाच्या साखळीवरसुद्धा परिणाम होऊ शकतो. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा जर वेळेत कारवाई करत नसतील, तर पुणेकरांसोमोर चुकीचा संदेश जातो — की निवृत्तीनंतरही खाकीचा वापर करून कोणीही जनतेसमोर ‘नायक’ म्हणून उभं राहू शकतो.
शहरात मोठ्या प्रमाणावर लावले गेलेले हे बॅनर आता कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन समाजात गोंधळ आणि दिशाभूल करणारे ठरत आहेत. प्रशासनाने यावर त्वरित निर्णय घेणं गरजेचं ठरतंय.