मित्रानेच मित्रावर केला प्राणघातक हल्ला ! विंचूरमध्ये चाकूने मित्रावर वार – आरोपी अटकेत
प्रतिनिधी : सुनिल क्षिरसागर
दि.०५, विंचूर (नाशिक) : विंचूर शहरात धक्कादायक प्रकार घडला असून, मित्रानेच आपल्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना विंचूर येथील मारवाडी पेठ परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
व्यापारी पवन नंदकुमार जाजू हे आपल्या घरासमोर उभे असताना विंचूर येथील मनोज बोराडे हा तेथे आला व काही कारणावरून त्यांच्याशी वाद घालत अचानक धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात पवन जाजू गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेनंतर संशयित आरोपी मनोज बोराडे हा घटनास्थळावरून फरार झाला होता. तथापि, लासलगाव पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पवन जाजू आणि मनोज बोराडे हे दोघेही मित्र असून काही वैयक्तिक कारणावरून हा वाद निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे. विंचूर परिसरात या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.