माझे माहेर पंढरी…!
माहेराचं सुख सासुरवाशीणीला विचारा. विवाह नंतर कन्या जशी रक्षाबंधन भाऊबीजेच्या निमित्ताने माहेराला जाते. तिचा आनंद गगनात मावत नाही कारण त्या माहेरातच तिचं बालपण गेलेलं असतं. माय बापाच्या अंगा खांद्यावर खेळून लहानाची मोठी झालेली असते. भावासोबत कधी खाऊ साठी भांडते तर, रुसलेल्या भावाला परत काहीतरी गंमत करून हसवते. बाल मैत्रिणींबरोबर खेळ खेळते. अंतर्मनातल्या गोष्टी सांगते. माय बापाकडे हक्काने हात पाय आढळून एखादी गोष्ट मागते व मायबाप तिचे लाड पुरवतो. त्याचप्रमाणे जगद्गुरु संत तुकोबाराय त्यांना पंढरपूर हे माहेरासारखं भासतं. तुकोबाराय गाथेतील अभंगातील प्रथम चरणात म्हणतात…

विठ्ठल सोयरा सज्जन विसावा | जाईन त्या गावा भेटावया || 1|| आदरणीय संत तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात… पंढरीत वास्तव्य करणारा विठुराया हा माझा सोयरा सज्जन आहे. अर्थात विवाहानंतर सासर हे तिचं गाव होतं. आणि माहेर हे जणू सोयऱ्याचं गाव. जरी बापाचं गाव असलं तरी, ते तिच्यासाठी मात्र पाहुण्याचं ठिकाण असतं कारण विवाहित लेकीसाठी ते पाहुण्यासारखंच गाव असतं. मात्र मायेचा ओलावा कायम तेथे दरवळत असतो. त्याचप्रमाणे जगद्गुरु संत तुकोबारायाला पंढरी हे माहेराप्रमाणे भासतं. त्यांना पंढरीलाच भेटायला जायचं आहे. कारण तेथे बापासह इतर सोयरेही राहतात म्हणून, सासुरवासींप्रमाणे आदरणीय संत तुकोबाराय हे अठ्ठावीस युगापासून पांडुरंगाचं वास्तव्य असणारं पंढरपूर अर्थात तुकाबाच्या माहेराला जाण्याचं सुख सांगतात.

जगद्गुरु संत तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणात म्हणतात… शिण भाग त्याशी सांगेन आपुला | तो माझा बापूला सर्व जाणे ||2|| जगद्गुरु संत तुकोबाराय आषाढी, कार्तिकीला पंढरपूरच्या वारीला जाताना त्यांच्या मनात असा भाव येतो की, सासुरवाशीन रक्षाबंधन, भाऊबीजेला माहेराला जाते. माय बापासोबत दोन गोष्टी सुखदुःखाच्या बोलते व संसाराचा गाडा ओढतांना जो शीन, थकवा आलेला असतो तो निघून जातो. त्याचप्रमाणे तुकोबाराय त्यांच्या माहेराला गेल्यावर त्या बाप पांडुरंगाला सर्व सुखदुःख सांगणार आहे. मोह माया रुपी आयुष्यातील हा भौतिक सुख, मायारूपी संसारातील मोह व त्या मोहातून निर्माण झालेले दुःख या दुःखातून आलेला थकवा मी माझ्या बा विठ्ठलाला सांगणार आहे. तो सर्व जाणतो. लेकराला काय हवे काय नको, हे जाण्यासाठी जाणण्या ची शक्ती फक्त बापातच असते.

माय माऊलीया बंधूवर्गाजना | भाकीन करुणा सकळीकांशी ||3|| जगद्गुरु संत तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणात म्हणतात, जसा सासुरवाशीन माहेराला आल्यावर घरात पाऊल टाकल्याबरोबर, मायच्या गळ्यात पडते. भावाला प्रेमाने मिठी मारते. तशीच त्यांच्यासोबत करुणा, दया भावाने जवळ करते त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, तेथे माझी माय रखुमाई आहे. तिला मी साष्टांग दंडवत घालीन. पुंडलिक, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान हे माझे भाऊ आहे. गरुड सुद्धा माझा लाडका बंधू आहे. त्याचप्रमाणे संत चोखामेळा, नरहरी सोनार,संत रोहिदास,संत कबीर हे माझे मित्र. आहेत मुक्ताई, मीराई, जनाई या माझ्या भगिनी आहेत यांच्यासह संत सावता, सूरदास, परसा भागवत माझ्यासाठी बंधुतुल्य आहे. या सर्वांसमवेत मी माझा दयाभाव व्यक्त व्यक्त करीन. त्यांना मिठी मारीन. त्यांच्यासोबत आनंदाने नाचेन व विठूरायाचे गुण गाईन. जगद्गुरु संत तुकोबाराय अभंगाच्या चतुर्थ चरणात म्हणतात… संत महंत सिद्ध महानुभव मुनी |जिवाभाव जाऊनी सांगेन त्या ||4||
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मल दिंडी’, ‘चरणसेवा’ आणि ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा समारोप
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://aksharaj.in/मुख्यमंत्र्यांच्या-उपस्/
अभंगाच्या वरील चरणांमध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात… सासुरवाशीन जशी घरातील वडीलधारी,आजी-आजोबा हयात असल्यावर त्यांच्या बाजूला बसून, जुन्या गोष्टी ऐकण्यात रममान होते तसेच तुकोबा म्हणतात मी उद्धव, अक्रूर, व्यास, अंबऋषी, नारद मुनी, महामुनी यांच्या सह जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ, कानोबा पाठक, व मीराबाई यांच्यासारखे संत महामुनी की जे तेथे वडीलधारे म्हणून आहेत. त्यांना मी माझ्या व्यथा सांगणार व त्यांचेही परमेश्वर भक्तीचे गुणगान ऐकणार. जगद्गुरु संत तुकोबाराय अंतिम चरणात म्हणतात… माझे माहेरी सुखा काय उणे | न लगे येणे जाणे तुका म्हणे ||5|| तुकोबाराय अंतिम चरणात म्हणतात की माझे माहेर पंढरपुर आहे. येथे सुखाची काहीच उणीव भासत नाही.कारण तेथे माझे मायबाप, बहीण-भाऊ,सखे सोयरे, संत मुनी आणि एवढेच काय माझे सुखदुःख ऐकणारे माझे जिवलग मित्रही आहेत. मी त्यांच्यासोबत सुविचारांची चर्चा करेल.या संसाररूपी मोह मायेपलीकडे त्यांच्या या विचारांनी जीवन विकासासाठी व सदगतीच्या वाटेवर चालेल. तेथे मला स्वर्ग सुखापेक्षाही परम सुख लाभते. अर्थात या हे ठिकाण मोक्षाची वाट दाखवणारं आहे. हेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून माझी सुटका करणार आहे. अशाप्रकारे जगदगरू संत तुकोबाराय आज प्रत्यक्ष शरीर रूपाने जरी आपल्या समवेत हजर नसले तरी, त्यांच्या गाथेच्या माध्यमातून व अभांगातील प्रत्येक ओवीतून पाझरणाऱ्या ज्ञानमय, नितिमुल्याचे शिक्षण देणाऱ्या अमृतासारखे आहे. पंढरपूरची महती अन पांडुरंगाचे गुण गात सुविचारांची वारी शेकडो वर्षांपासून अखंड चालू आहे. म्हणून आषाढी, कार्तिकीला देशा-विदेशातील लाखो भाविक हजारो किमी पायी प्रवास करून पंढरपूरला जातात. कारण त्या पावन भूमीत चैतन्य आहे. “बा”पांडुरंग सगळ्यांचे सुख दुःख ऐकून घेतो. जगण्यास बळ देतो. म्हणून पंढरपूर माझे माहेर आहे. या माहेरात युगानुयुगे कटेवर कर ठेऊन, असा हा जगदपिता लेकरांच्या कल्याणासाठी उभा आहे.
त्याला शरण जा. त्याच्या चरणी लीन होऊन परमसुखाची अनुभूती घ्या. असे तुकोबाराय म्हणतात. राम कृष्ण हरी…!आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!
श्री.विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि.बुलडाणा मोबा. 9763282077