यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
अक्षराज : प्रतिनिधी
दि.२९, यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ दौऱ्याच्या सुरुवातीला यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, माजी मंत्री मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, माजी खासदार रामदास तडस आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी रोपटे देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले व पोलीस स्टेशनची माहिती दिली. पोलीस प्रशासनातर्फे 27 लाख 11 हजार 111 रुपयांच्या निधीचा धनादेश पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. वीर शहीद जवान पत्नी सुनिता प्रकाश विहीरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमिनीचा पट्टा वाटप करण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यातील बालगुन्हेगारी, व्यसनाधीनता, अल्पवयीन मुलांमुलींचे हरवल्याचे अधिक प्रमाण यावर उपाययोजना करण्याच्या हेतुने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन प्रस्थान’ उपक्रमाची माहिती देण्यात आली. ‘ऑपरेशन प्रस्थान’ उपक्रमाच्या पहिल्या टप्पात 21 एप्रिल ते 29 मे 2025 या कालावधीत 1800 मुलींना निवासी शिबीरामध्ये कराटे प्रशिक्षणासह कायदे विषयक, आरोग्य विषयक, कार्यशाळा तसेच करीअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.
हे वाचले का ? 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
चंद्रपूर जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी ३० तीस हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
https://aksharaj.in/सहायक-महसूल-अधिकारी-३०-ती/
त्यावेळी मुलींनी कराटेचे प्रात्यक्षिक सादर केले. ‘ऑपरेशन प्रस्थान’ उपक्रमांचा दुसरा टप्पा 7 जुलै 2025 पासून सुरु करण्यात आला असून त्यामध्ये एकूण 30 हजार युवक – युवतींना प्रशिक्षित करणे हा प्रमुख उद्देश आहे. आतापर्यत एकूण 11 शाळांमध्ये 3,800 विद्यार्थाना प्रशिक्षण दिले आहे. ऑपरेशन प्रस्थानच्या दोन भागामध्ये एकूण 5,700 युवतींना कराटे प्रशिक्षण देण्यात आले. ‘ऑपरेशन प्रस्थान’ तीन टप्यामध्ये दुर्गम भागातील आदिवासी आश्रम शाळा व उपविभागातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली असून ‘ऑपरेशन प्रस्थान’ ही मोहीम संपूर्ण भारतभर राबविण्यात यावी असे सुचविले आहे. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, पूर नियत्रंण, वाहतूक नियमन इत्यादींसाठी युवक युवतींनी पोलिसांसोबत राहून कामकाज केले.