चंद्रपूर जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी ३० तीस हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
अक्षराज : वसंत वडस्कर
दि.३ ०, चंद्रपुर : जिल्हा पुर्नवसन कार्यालय, प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबा खांडेकर यांनी ३०,०००/- रूपये लाच रक्कम मागणी करून स्विकारल्याने ॲन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने दि. २८/०९/२०२५ रोजी कार्यवाही केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांच्या आईची मौजा चारगांव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथील घर व खुली जागा औष्णीक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे गेलेली असल्याने सदर मालमत्तेवर तक्रारदार यांचे मुलीचे नाव प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणुन नामनिर्देशीत केले होते. महाराष्ट्र राज्य वीज निर्मीती कंपनी मर्या. मुंबई यांचेकडून घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये तक्रारदार यांची मुलगी ही प्रकल्पग्रस्त या राखीव जागेतून ‘कनिष्ठ अभियंता’ या पदाकरीता निवड झालेली होती.
दैनिक अक्षराज ३० सप्टेंबर २०२५
पेपर येथे वाचा व फॉरवर्ड करून सहकार्य करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://epaper.aksharaj.in/view/327/daily-aksharaj-30-september-2025#
तक्रारदार यांचे मुलीचे प्रकल्पग्रस्त या राखीव जागेतून निवड झालेली असल्याने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुर्णपडताळणी करण्याकरीता जुलै /२०२५ मध्ये जिल्हा पुर्नवसन कार्यालय चंद्रपूर येथे पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार तक्रारदार हे त्यांच्या मुलीसह प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील जिल्हा पुर्नवसन कार्यालय येथील आलोसे राहा. महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना भेटले असता तक्रारदार यांना त्यांच्या मुलीच्या नोकरीकरीता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुर्नपडताळणी करून अहवाल महाराष्ट्र राज्य वीज निर्मीती कंपनी मर्या. मुंबई यांना पाठविण्याकरीता २ लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती सध्या १ लाख रूपये व अहवाल तयार झाल्यानंतर ३० हजार रूपये पैशाची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी १ लाख रूपये जुलै /२०२५ मध्ये दिलेले होते.

त्यानंतर दिनांक २६/०९/२०२५ रोजी तक्रारदार यांनी आलोसे खांडेकर यांना फोन करून मुलीच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचे पुर्नपडताळणी अहवाल पाठविले किंवा कसे याबाबत विचारणा केली असता आलोसे खांडेकर यांनी तक्रारदार यांना कार्यालयात बोलावून उर्वरीत ३०,०००/- रू. घेवून या अन्यथा अहवाल पाठविणार नाही असे म्हणाले. परंतु तक्रारदार यांना आलोसे सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबा खांडेकर यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन दिनांक २८/०९/२०२५ रोजी तक्रार दिली.
तक्रारदार यांचे प्राप्त तक्रारीवरून दि. २८/०९/२०२५ रोजी आलोसे सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबा खांडेकर यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी स्वतः करीता ३०,०००/-रुपये लाच रक्कमेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून दि. २८/०९/२०२५ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबा खांडेकर यांनी प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील उपजिल्हाधिकारी (पुर्नवसन) कार्यालय चंद्रपूर येथील कार्यालयात ३०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपासकार्य सुरू आहे.
सदरची कार्यवाही सागर कवडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्रीमती माधुरी बावीस्कर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पो. हवा. हिवराज नेवारे, विजेंद्र वाढई, पोशि अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदिप ताडाम, राजेंद्र चौधरी, सचिन गजभिये, महेश माहूरपवार, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, चापोशि/सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व चापोशि संदीप कौरोसे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. हॅश व्हॅल्यु घेण्यात आलेली आहे.