सात इंचही जागा देणार नाही : आ. जोरगेवारानी अधिकाऱ्यांना फटकारले
अक्षराज : वसंत वडस्कर
दि. २१, चंद्रपूर : लोकशाहीत लोकभावनेचा आदर केलै गेला पाहिजे. रामबाग येथील सात एकर जागेवर जिल्हा परिषदेच्या इमारतीला स्थानिकांचा विरेध असतानाही येथे वृक्षतोड करुन कामाला सुरुवात करणे ही योग्य बाब नाही. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सात एकर तर दूर येथील सात इंच जागेलाही आम्ही हात लावू देणार नाही असा इशारा देत येथे सुरु असलेले काम आ. किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करत बंद पाडले आहे.

या पाहणीदरम्यान महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, उपविभागीय वन अधिकारी नायगावकर, जिल्हा परिषदेच्या उपअभियंता जोशी, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, प्रकाश देवतळे, मंडळ अध्यक्षा ॲड. सरिता संदूरकर, मनोरंजन रॅाय, राशिद हुसेन, राकेश बोमनवार, सज्जद अली, करणसिंह बैस, नितीन शहा, रजनी पॅाल आदींची उपस्थिती होती.
रामबाग येथे होणाऱ्या जिल्हा परिषद इमारतीला स्थानिक नागरिकांचा होत असलेला विरोध लक्षात घेता, आ. किशोर जोरगेवार यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेला हे काम थांबविण्यास भाग पाडले होते. त्यानंतर त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन रामबाग मैदानावर इमारत बांधण्याचा प्रस्तावच रद्द करण्याची मागणी केली होती. याबाबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

मात्र, सदर बैठक होण्याआधीच जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी रामबाग मैदाना लगतची जागा निश्चित करुन येथील जवळपास ६० मोठी झाडे तोडण्यात आली आहे. कंत्राटदाराने इमारत बांधकामाचे सर्व साहित्य येथे टाकले असून कामास सुरुवात केली आहे. याबाबत आज आ. किशोर जोरगेवार यांनी सदर जागेवर जात अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी करत काम बंद पाडले आहे. झाडे तोडल्याबद्दलही आ. किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहेत.
लोकशाहीमध्ये लोकांच्या भावमा सर्वोच्च असतात. या ठिताणी नागरिकांचा स्पष्ट विरोध असतानाही वृक्षतोड करुन कामास सुरुवात करणे ही बाब दुर्दैवी आहे, असे सांगत ही जागा जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी नाहीच. अनेक वर्षापासून या जागेवर स्थानिक नागरिक आपला विरंगुळा शोधतात. झाडांमुळे निसर्गसंपन्न झालेला हा परिसर नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनाचा भाग आहे. अनेक खेळाडूंसाठी हे उत्तम मैदान आहे. यावर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण आम्ही सहन करणार नाहीं, असे, आ. किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट शब्दात खडसावले आहे. संबंधित कंत्राटदाराने ४८ तासांच्या आत येथील इमारत बांधकाम साहित्य दुसरीकडे हलविण्याचे निर्देशही यावेळी आ. किशोर जोरगेवार यानी अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी स्थानिक नागरिकांचीही उपस्थिती होती.