येरवड्यात कोयत्यांचा मध्यरात्री दहशत नाच — गणेश नगर परिसर थरारले
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.०८, येरवडा (पुणे) : येरवडा गणेश नगर भागातील औद्योगिक शाळा , परिसरात, लॉकअप ग्रुप, दुर्गा माता मंदिर, या भागामध्ये टोळक्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अक्षरशः दहशत नाच घातला. हातात धारदार कोयते, चेहऱ्यावर रुमाल, डोळ्यांत विक्राळ रोष आणि तोंडातून गलिच्छ शिव्यांचा पाऊस — या मोकाट गुन्हेगारांनी गल्लीगल्ली फिरत नागरिकांना उघडपणे शिव्या देत हवा चिरणारे कोयत्यांचे फटकारे मारले. पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला, तर परिसरात भीतीची दाट सावली पसरली. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मी नगर भागात दोन गटांमध्ये रक्तरंजित गँगवार झाल्याने वातावरण आधीच तापले होते, त्यात या प्रकाराने नागरिकांच्या संतापाला तोंड फुटले आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, दोन गटांमध्ये सुरू झालेलं भांडण चिघळून थेट शस्त्रांच्या खुले प्रदर्शनात बदललं. स्थानिक नागरिकांचा इशारा स्पष्ट आहे. रस्त्यावर कोयत्यांचं खुले प्रदर्शन हा थेट दहशतवाद आहे, आणि यावर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊन भीषण परिणाम होऊ शकतात.