कल्याणी नगरातील ‘हॉटेल बॉलर’ पबमध्ये वाद !
पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा विरोध, १४ जण ताब्यात
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.१४, येरवडा (पुणे) : येरवडा पोलीस हद्दीतील कल्याणी नगर परिसरातील ‘हॉटेल बॉलर’ पबमध्ये रविवारी रात्री वादग्रस्त घटना घडली. येथे नेदरलँडमधील आर्टिस्ट इम्रान नासिर खान याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र सोशल मीडियावर हा कलाकार पाकिस्तानी नागरिक असल्याची बातमी पसरल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला.

सदर कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी सकल हिंदू समाज आणि मराठा आंदोलक कार्यकर्ते पबबाहेर जमले. कार्यकर्त्यांनी हॉटेलकडे येणाऱ्या नागरिकांना थांबवण्याचा प्रयत्न केला तसेच कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून जमावाला समजावले, परंतु परिस्थिती बिघडू नये म्हणून अखेरीस १४ आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते, मात्र घटनास्थळी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती सध्या पूर्णतः नियंत्रणात आहे.

दरम्यान, भारत–पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात आधीच उत्साह आणि काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण होते. त्यातच पाकिस्तानी कलाकार कार्यक्रमासाठी आल्याची चर्चा पसरल्याने नागरिकांच्या भावना अधिक भडकल्या. “देशभरात पाकिस्तानविरोधी भावना उसळल्या असताना पुण्यासारख्या शहरात पाकिस्तानी कलाकाराला पबमध्ये बोलावणे म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळ आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला.
पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले की, संबंधित कलाकार प्रत्यक्षात नेदरलँडचा नागरिक आहे, मात्र सोशल मीडियावर आलेल्या चुकीच्या माहितीतून गैरसमज निर्माण झाला. तरीदेखील पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. एका बाजूला क्रिकेट सामन्यातील भारत–पाकिस्तानचा तणाव, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी आर्टिस्टची चुकीची बातमी – या दुहेरी पार्श्वभूमीमुळे कल्याणी नगरमध्ये वातावरण अधिकच पेटले.