पानोलीच्या उपसरपंचपदी अनुसया खामकर यांची बिनविरोध निवड
अक्षराज : वसंत रांधवण
दि.०३, पारनेर (अहिल्यानगर) : तालुक्यातील पानोली गावच्या उपसरपंचपदी अनुसया बाबाजी खामकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. बायसा संजय काळोखे यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांची निवड झाली. मासिक सभेत सर्व सदस्यांनी एकमताने अनुसया खामकर यांचा उपसरपंच पदासाठी ठराव मांडला आणि त्यांची बिनविरोध निवड केली. या महत्त्वपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक अधिकारी दिंगबर काटे आणि सरपंच संदीप गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडली.

सामाजिक कार्याची पार्श्वभूमी नवनिर्वाचित उपसरपंच अनुसया बाबाजी खामकर या समता परिषदेचे पारनेर तालुका अध्यक्ष आणि निलेश लंके युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नवनाथ खामकर यांच्या मातोश्री आहेत. नवनाथ खामकर यांच्या नेतृत्वाखाली खामकर परिवार सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय असून, गावच्या विकासकामांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यामुळेच अनुसया खामकर यांच्या निवडीमुळे गावाच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निवडीनंतर अनुसया खामकर यांच्यावर विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

मिरवणुकीदरम्यान खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी, पानोली गावचे सरपंच संदीप गाडेकर, सरपंच शिवाजी शिंदे,सरपंच मोहिनी भगत, उपसरपंच प्रशांत साळवे, उपसरपंच बायसा काळोखे, राजमाता पतसंस्थेचे संस्थापक डॉ. रामचंद्र थोरात, माजी सरपंच अनिलशेठ गाडेकर, दिलीप काळोखे, पोपट काळोखे, संजय काळोखे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच अनुसया खामकर यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या निर्णयामुळे पानोली ग्रामपंचायतीत महिलांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.



