भर पावसात डोंबिवलीत फेरीवाल्यांचा जोरदार मोर्चा…
प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास मुख्यालयावर आंदोलनाचा इशारा….
अक्षराज भानुदास गायकवाड
दि.२७, डोंबिवली : डोंबिवलीत आज भर पावसात कष्टकरी फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांनी जोरदार आंदोलन करत ह प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा नेला. कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हातगाडी, पथारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले.

मोर्चाचे मुख्य मुद्दे होते — रस्त्यांवरील पार्किंग फलक हटवणे, तसेच फेरीवाला कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करणे. आंदोलनकर्त्यांनी ह प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी विष्णुनगर पोलीस ठाण्याकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सदर विषयावर यापूर्वीही, दिनांक १६ मे २०२५ रोजी इंदिरा गांधी चौक, डोंबिवली पूर्व येथे धरणे आंदोलन झाले होते. मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने योग्य प्रतिसाद दिला नसल्याने आजचे आंदोलन प्रभाग कार्यालयावर करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, येत्या सात दिवसांमध्ये न्याय मिळाला नाही, तर पुढील टप्प्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयावर (कल्याण) तीव्र आंदोलन छेडले जाईल आजच्या आंदोलनात अमोल केंद्रे, बबन कांबळे, दीपक भालेराव, अभयलाल दुबे, राजू गुप्ता, काळुबाई गायकवाड, राकेश सिंग, लवजारी गुप्ता यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि फेरीवाले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फेरीवाल्यांचे प्रश्न आणि त्यांच्या न्यायासाठीचा लढा प्रशासन किती गांभीर्याने घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.