डॉक्टरकडे ५० हजारांची खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; कोयता जप्त
अक्षराज : प्रतिनिधी
दि.१४, येरवडा (पुणे) : येरवडा परिसरातील एका डॉक्टरकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अमोल जिवराज पिल्ले (वय ४६, रा. जय जवान नगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पुणे व कर्नाटकातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे ५८ गुन्हे दाखल असून, यापूर्वी त्याच्यावर तडीपारीची कारवाईही करण्यात आली होती.
८ जुलै २०२६ रोजी आरोपीने जय जवान नगर येथील मथुरा हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ. सुभाष शंकरराव कोंकणे (वय ७५) यांना धमकावत ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी ९ जुलै रोजी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राहुल परदेशी व अक्षय शिंदे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून अमोल पिल्ले याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरवसे करीत आहेत.



