सर्पमित्र सज्जन पाटील यांच्या धाडसाने अजगराला जीवदान
अक्षराज : विनोद वास्कर
दि.०९, शिळगाव (ठाणे) : शिळगाव येथे नंदा आलिमकर यांच्या घरात अचानक तब्बल १२ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घरात अजगर शिरल्याचे पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घरातील सदस्यांना अजगर दिसताच त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारी धावून आले. अजगराची प्रचंड लांबी पाहून सर्वांनाच घाम फुटला. कोणीही जवळ जाण्याचे धाडस करीत नव्हते.

यावेळी तातडीने सर्पमित्र सज्जन पाटील यांना पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच सज्जन पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत अत्यंत धाडस, कौशल्य आणि प्रसंगावधान राखत अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. अजगराला पकडल्यानंतर त्याला कोणतीही इजा न करता त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सर्पमित्र सज्जन पाटील यांच्या तत्परतेमुळे एका मोठ्या संकटाचे निवारण झालेच, शिवाय या अजगरालाही जीवदान मिळाले.
वन्यजीव हे निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. साप दिसल्यास घाबरून न जाता त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये किंवा स्वतः पकडण्याचा धोका पत्करू नये. तातडीने प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सर्पमित्र सज्जन पाटील यांच्या धाडसाचे आणि वन्यजीव संवर्धनाच्या कार्याचे शिळगाव परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.


