नगरसेविका वेदिका पाटील यांचा ठाणे महापालिकेकडे प्रस्ताव
भोलेनाथनगर येथील जागृत देवस्थानाचा मान ठेवून नागरिकांची मागणी
अक्षराज : विनोद वास्कर
दि.१६, शिळफाटा (ठाणे) : ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्र. २९ मधील शिळफाटा येथील उड्डाणपुलाला “श्री. खरवली देवी उड्डाणपुल” असे नाव देण्यात यावे अशी मागणी करणारा प्रस्ताव नगरसेविका सौ. वेदिका साहिल पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे सादर केला आहे.

प्रस्तावात काय म्हटले आहे?
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ च्या नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांनी दि. १३/०७/२०२६ रोजी ठाणे आयुक्त सौरव राव, ठाणे महापौरांना पालिका सचिव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये मौजे शिळ, भोलेनाथनगर (खरवली देवी परिसर) पोस्ट डावले, जि. ता. ठाणे येथे जागृत देवस्थान असलेले खरवली देवी मंदिर आहे. हे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शिळफाटा जंक्शन येथे एम.एम.आर.डी.ए. च्या माध्यमातून उड्डाणपुल बांधण्यात आला आहे. पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी आहे की, या उड्डाणपुलाचे नामकरण “श्री. खरवली देवी उड्डाणपुल” असे करण्यात यावे.

नागरिकांच्या भावनेचा आदर !
प्रभाग क्रमांक २९ मधील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या भावनेचा आदर करत, शिळफाटा येथील उड्डाणपुलाला “श्री. खरवली देवी उड्डाणपुल” असे नाव देण्यासाठी वेदिका पाटील यांनी प्रस्तावाची सूचना दिली आहे. या प्रस्तावावर कृष्णा शारदा दादू पाटील यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. तसेच याची प्रत मुकेश मोकाशी, गटनेते (भाजपा), मा. आयुक्त आणि मा. महापालिका सचिव यांना देखील देण्यात आली आहे.
नगरसेविका वेदिका पाटील यांनी या प्रस्तावावर आगामी सर्वसाधारण सभेत चर्चा करून ठराव पारित करून पुढील कार्यवाही करण्याची विनंती महापालिका प्रशासनाला केली आहे.



