नवी मुंबई देशातील प्रथम क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर पुरस्काराची मानकरी

Spread the love

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापौर सुजाता पाटील यांनी स्विकारला सन्मान

अक्षराज : जे. के. पोळ
दि.११, नवी मुंबई :
शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयांच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ मध्ये यावर्षी नवी मुंबई शहर देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.

नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी, उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या उपस्थितीत हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यमंत्री तोखन साहू व सचिव सत्येंद्र सिंग उपस्थित होते. या पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे उपस्थित होते.

देशातील स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत सातत्याने अग्रभागी राहणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने मागील 3-4 वर्षांपासून ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे आपले ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून त्याकडे नियोजनबद्ध पावले टाकत वाटचाल सुरू ठेवली होती. स्वच्छतेमधील आपले मानांकन दरवर्षी उंचावत अखेरीस यावर्षी देशातील 4751 शहरांमधून नवी मुंबई महानगरपालिकेचे सेवाभावी स्वच्छताकर्मी व नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून समस्त लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून देशात प्रथम क्रमांकाच्या सर्वोत्तम स्वच्छ शहराचे लक्ष्य महानगरपालिकेने साध्य केले.

नवी मुंबईतील शहरातील प्रत्येक नागरिकासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असून आपल्या सर्वांची प्रथम प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार महामहीम राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते स्वीकारण्याचा बहुमान मला लाभला हे माझे भाग्य असून हा पुरस्कार मी समस्त नवी मुंबईकर नागरिकांना आणि यासाठी सर्वाधिक काम करणाऱ्या स्वच्छतामित्रांना आणि स्वच्छतासखींना अर्पण करीत असल्याचे मत यावेळी महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केले.

उपमहापौर दशरथ भगत यांनीही या पुरस्कारामध्ये शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छताकर्मीच्या योगदानाचे सर्वाधिक महत्व असल्याचे सांगितले. यापुढील काळात सुगंधी शहर अभियानाच्या माध्यमातून आणखी चांगले काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनीही सर्व नागरिकांच्या आणि स्वच्छताकर्मींच्या कार्याचे हे यश असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची स्वच्छताकार्याला दिलेली जोड आणि त्यामध्ये नागरिकांचा लाभलेला सक्रिय सहभाग याचा सखोल विचार राष्ट्रीय पातळीवर झाला आणि नवी मुंबई देशात प्रथम क्रमांकाच्या शहराची मानकरी ठरली असे सांगितले.

हा सन्मान स्वच्छ भारत मिशन – शहरी अंतर्गत नवी मुंबईच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचे प्रतीक आहे. नवी मुंबईने देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये सातत्याने स्थान मिळवले असून, सुपर स्वच्छ लीग मध्ये समाविष्ट होण्याचा बहुमान तसेच सप्ततारांकित कचरामुक्त शहर (जीएफसी) आणि वॉटर प्लस प्रमाणपत्र ही ओळख कायम राखली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या या यशामध्ये दैनंदिन स्वच्छतेची गुणवत्ता उंचावत ठेवणे, कचरा संकलन आणि कचरा वाहतुक या दोन्ही क्षेत्रात इंटिग्रेटेड कमांड कंट्रील सेंटर अशा अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करणे, वर्गीकृत कचऱ्यावर त्याच्या श्रेणीनुसार सुयोग्य प्रक्रिया करणे त्यासोबत वस्त्र कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणारे देशातील पहिले केंद्र यशस्वीरित्या चालविणे अशा विविध बाबींचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे पाण्याच्या पुनर्वापरावर भर देणे, नागरिकांना तक्रार करण्यासाठी व तक्रारींचे निराकरण करून त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी माय एनएमएमसी ॲप, सिटीजन ग्रिव्हेन्स पोर्टल अशा विविध डिजीटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करणे आदी बाबींचा प्राधान्याने विचार करण्यात आला. याशिवाय प्लास्टिक प्रतिबंधात्मक उपाययोजना, नागरिकांच्या सहभागातून व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीमांचे आयोजन व त्यामध्ये विद्यार्थी व युवकांच्या सहभागावर भर अशा वेगवेगळ्या गोष्टी प्राधान्याने करण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!