रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा, दर्शन रांगेत पाणी, आरोग्य व स्वच्छतागृहांची व्यवस्था करा
सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश…
अक्षराज : विकास सरवळे
दि. १८ पंढरपूर : आषाढी वारीच्या यशस्वी नियोजनानंतर आता कार्तिकी यात्राही आदर्श आणि वारकरीस्नेही करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसावी. यात्राकाळात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, दर्शन रांगेतील भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विशेष म्हणजे, कार्तिकी यात्रेत व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवावी. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
कार्तिकी यात्रेच्या नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

व्हीआयपी दर्शनाला पूर्णविराम; सामान्य वारकऱ्यांना प्राधान्य!
कार्तिकी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. या भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असावे. दर्शन रांगेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासन आणि मंदिर समितीने विशेष खबरदारी घ्यावी. व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवून सामान्य वारकऱ्यांना प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री गोरेंनी दिले.
मंदिर समितीने प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी. नियुक्त सुरक्षारक्षकांच्या चारित्र्याची पडताळणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा. मंदिरातील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी भाविकांशी सौजन्याने वागावे. शासकीय महापूजेचे नियोजनही पोलीस प्रशासनाच्या सूचनांनुसार करावे, असे त्यांनी सांगितले.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेने आपल्या हद्दीतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत. दर्शन रांगेत स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे, मॅट आणि पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी. आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेतही भाविकांना दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले.

पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे. महावितरणने यात्राकाळात अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा करावा. नदीपात्रात होडीतून प्रवास करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा प्रमाणात लाईफ जॅकेट उपलब्ध करून द्यावेत. तसेच पंढरपूर शहर आणि परिसरात मांस-मटण व मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याबाबतही त्यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या.
वाखरी येथे मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरत असल्याने त्या ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बाजार संपल्यानंतर पालखीतळाची स्वच्छता तातडीने करावी. यात्राकाळात प्रत्येक विभागाला सोपविण्यात आलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी. प्रादेशिक परिवहन विभागाने वारकऱ्यांच्या वाहनांना विनाकारण अडचणी निर्माण करू नयेत, असेही पालकमंत्री गोरेंनी स्पष्ट केले.
बैठकीच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी कार्तिकी वारीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती सादर केली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा आणि शासकीय महापूजेच्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनीही आपापल्या विभागाच्या तयारीचा आढावा सादर केला. एकंदरीत, कार्तिकी यात्रेत व्हीआयपी संस्कृतीला फाटा देत सामान्य वारकऱ्यांना प्राधान्य, स्वच्छतेवर विशेष लक्ष आणि सुरक्षिततेसह दर्जेदार सुविधांचा संकल्प प्रशासनाने केला आहे.


