निवृत्त सैनिकाची ६ लाखांची फसवणूक, पैसे मागताच जीवे मारण्याची धमकी!
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.१०, लोहगाव (पुणे ) : देशासाठी सीमेवर शौर्य गाजवणाऱ्या एका निवृत्त सैनिकाच्या सन्मानाची पुणे शहरात अक्षरशः लक्तरे वाजवली गेली आहेत.पुणे शहरातील लोहगाव भागातील ‘साई समृद्धी पार्क’ या वादग्रस्त आणि बेकायदेशीर बांधकाम प्रकल्पाच्या नावाखाली एका तथाकथित बिल्डरने निवृत्त सैनिक जनार्दन वैद्यनाथ यादव (वय ६५, लोहगाव) यांची तब्बल सहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या हक्काच्या रकमेची मागणी करताच गैर अर्जदार बिल्डरने “जे करायचं ते करा, आम्हाला कोणी काही करू शकत नाही” अशी थेट जीवे मारण्याची धमकी देऊन कायद्यालाच आव्हान दिले आहे.
जनार्दन यादव हे भारतीय सैन्यात आणि नंतर महाराष्ट्र कारागृह विभागात प्रामाणिक सेवा बजावून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. वृद्धापकाळात हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या यादव यांनी २०२१ साली लोहगाव येथील ‘साई समृद्धी पार्क’मधील एक फ्लॅट बुक करण्यासाठी बिल्डर महेश मोझे याच्याकडे संपर्क साधला. मोझेने “सर्व परवानग्या मिळाल्या आहेत” असे खोटे आश्वासन देऊन यादव यांच्याकडून चेकद्वारे सात लाख रुपये घेतले.
बेकायदेशीर प्रकल्प जमीनदोस्त, ६ लाख थकवले!
काही महिन्यांतच या प्रकल्पाचा खरा चेहरा उघड झाला. पुणे महानगरपालिकेने हा प्रकल्प बेकायदेशीर ठरवत त्यावर बुलडोझर फिरवून तो जमीनदोस्त केला. आपली जमा केलेली रक्कम परत मिळावी यासाठी यादव यांनी मोझेकडे वारंवार मागणी केली. गैर अर्जदाराने केवळ एक लाख रुपये परत केले आणि उर्वरित सहा लाख रुपये परत करण्यास नकार देत टाळाटाळ सुरू ठेवली. यादव यांनी पैसे मागणे सुरू ठेवताच गैर अर्जदार महेश मोझे व त्याच्या पत्नीने त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. “पोलिसांकडे जा तरी काही होणार नाही,” असे उद्दाम वक्तव्य करून गैर अर्जदाराने आपल्या गुंडगिरीची हद्द ओलांडली.

या गंभीर घटनेबाबत निवृत्त सैनिक जनार्दन यादव यांनी पुणे पोलीस आयुक्त, परिमंडळ ४ चे उपायुक्त आणि विमाननगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गैर अर्जदार महेश मोझे हा सराईत फसवणूकदार असून त्याने यापूर्वीही अनेकांना फसवले आहे. देशासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या जवानाला जर आपल्या देशातच न्यायासाठी धावपळ करावी लागत असेल, तर ही संपूर्ण व्यवस्थेची लाज आहे, असा रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून गैर अर्जदारांना तात्काळ अटक करावी आणि जवानाचा सन्मान राखावा, अशी जनतेची मागणी आहे. विमाननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे पुढील तपास करत आहेत.



