शिळ-महापे, शिळफाटा-दहिसर, शिळफाटा-देसाई मार्गावर रोजच वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

Spread the love


लोखंडी केबिनमध्ये ‘वसुली’ सुरू असल्याचा आरोप; “प्रशासन झोपेत आहे का?”

नागरिकांचा सवाल !

अक्षराज : विनोद वास्कर
दि.२४, शिळफाटा (ठाणे) :
शिळ-महापे रोडसह शिळफाटा ते दहिसर आणि शिळफाटा ते देसाई या महत्त्वाच्या मार्गांवर दररोज भीषण वाहतूक कोंडी होत असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहनांच्या लांबच लांब रांगा, कंटेनर-ट्रकची गर्दी आणि १५ मिनिटांच्या अंतरासाठी २ तासांचा वेळ लागत असल्याने नोकरदार वर्ग व व्यावसायिक संतप्त झाले आहेत.

सर्वच मार्गांवर अशीच परिस्थिती…
केवळ शिळ-महापे रोडच नाही, तर शिळफाटा ते दहिसर आणि शिळफाटा ते देसाई नाका या मार्गांवरही रोजचीच ही कोंडी झाली आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली असून, संपूर्ण शिळफाटा परिसर वाहतूक कोंडीने जाम झाला आहे.

“अधिकारी पेपर चेकिंगमध्ये, रस्ता जाम”
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक अधिकारी एका बाजूला ८-१० जण उभे राहून केवळ कागदपत्रे तपासण्यात व्यस्त असतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. “रोड टॅक्स भरूनही मोकळे रस्ते मिळत नाहीत, तर असे अधिकारी काय कामाचे?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

लोखंडी केबिनमध्ये ‘वसुली’चा आरोप
याचवेळी वाहतूक विभागाने रस्त्यावर उभारलेल्या खासगी लोखंडी केबिनमध्ये वाहन चालकांकडून पैसे उकळले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. “कागदपत्रे व्यवस्थित नसल्यास ‘एकतर दंड भरा नाहीतर तोडपाणी करा’ अशी उघडपणे विचारणा केली जाते,” असा दावा वाहनचालकांनी केला आहे.

कायमस्वरूपी तोडग्याची मागणी…
शिळफाटा परिसरातील या तिन्हीही प्रमुख मार्गांवर रोज होणाऱ्या कोंडीमुळे नागरिकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. प्रशासनाने या ‘वसुली’च्या आरोपांची चौकशी करून वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!