संगमवाडीत डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू !
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.०५, पुणे : शहराच्या मध्यवर्ती संगमवाडी परिसरात मंगळवार रात्री घडलेल्या अपघाताने संपूर्ण पुणे हादरले आहे. ४ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास नाशिकहून पुण्यात आलेल्या कामिना (कविता) शिताफे (वय ३५, रा. साईनाथ नगर, खराडी) या महिलेचा MH 12 SX 7923 क्रमांकाच्या डंपरखाली येऊन भीषण मृत्यू झाला. परिपल्स ट्रॅव्हल्स ऑफिससमोर ही दुर्घटना घडली. जड वाहनाच्या धडकेने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेत सर्वात संतापजनक बाब म्हणजे… ही दुर्घटना घडली ती पूर्णपणे प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे. संगमवाडी परिसर हा दिवसभर वाहतुकीने गजबजलेला असून रात्रीच्या सुमारास येथे डंपर आणि जड वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू असते. नदीपात्रातील कामांसाठी जाणारी जड वाहने, त्यावर कोणताही नियंत्रण नाही. एकीकडे लक्झरी बस व खासगी ट्रॅव्हल्सची गर्दी, तर दुसरीकडे जड वाहतुकीची धामधूम — या गोंधळात सामान्य नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात आहे.
प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक नियंत्रण, प्रकाश व्यवस्था आणि रस्त्यांची सुरक्षितता याबाबत पूर्णपणे हात झटकले आहेत. अशा असुरक्षित परिस्थितीत चालणाऱ्या महिलांच्या, कामगारांच्या जीवाची कोणालाही किंमत उरली नाही, हेच या घटनेतून स्पष्ट झाले आहे. अपघाताने पुण्यात संतापाची लाट पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. संगमवाडी परिसरात जड वाहतूक पूर्णतः बंद करून तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.



