नगरसेविका वेदिका पाटील यांच्या तक्रारीची तातडीने दखल; जेसीबी व १० कर्मचारी तैनात
अक्षराज : विनोद वास्कर
दि.०१, शिळफाटा (ठाणे) : ३० जुन, ०१ जुलै २०२६ या दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने शिळफाटा परिसराला महापुराचे स्वरूप आले होते. नैसर्गिक नाल्यांवरील अनधिकृत बांधकामे आणि नाले तुंबल्याने शिळफाटा-मुंब्रा, शिळफाटा-महापे आणि शिळफाटा-पनवेल या तिन्ही मुख्य मार्गांवर गुडघाभर ते कंबरेभर पाणी साचले होते.

उपायुक्तांनी स्वतः केली पाहणी, तक्रारीची दखल
नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत ठाणे उपायुक्त यांनी स्वतः शिलफाटा परिसरात पाणी तुंबलेल्या भागाचा दौरा केला.

तसेच नगरसेविका वेदिका साहिल पाटील भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा प्रकोष्ट अभियंता अध्यक्ष साहिल पाटील, ठाणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता विजय मलिया आणि उप अभियंता विजय बोई यांना सोबत घेऊन शिळगाव, डायघर, कल्याण फाटा,परिसराची पाहणी केली.
ठाणे उपायुक्तांनी शिळगाव, कल्याण फाटा, शिळफाटा परिसर आणि डायघर या भागांची सखोल पाहणी केली. शिळफाटा-मुंब्रा मार्ग, शिळफाटा-महापे मार्ग, शिळफाटा-पनवेल मार्गासह महाकालेश्वर मंदिर परिसर, हनुमान मंदिर परिसर, रिगल हॉटेल समोरील सर्कलची पाहणी करण्यात आली.

तातडीच्या उपाययोजना सुरू
पाहणीनंतर तात्काळ एक जेसीबी आणि १० कर्मचाऱ्यांचे पथक शिळफाटा परिसरासाठी तैनात करण्यात आले. पाणी उपसा आणि नाले मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
“उपाययोजनांमुळे सध्या पूरस्थिती कमी होत आहे. पाणी ओसरत असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे,” असे उपायुक्तांनी सांगितले.
‘अतिक्रमण हटवा’ – सूचना
“नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण काढून कायमस्वरूपी तोडगा काढा. नागरिकांना त्रास होता कामा नये,” असे स्पष्ट आदेश उपायुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.



