खुनाच्या प्रयत्नातील २ महिन्यांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-४ने ठोकल्या बेड्या
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.१६, पुणे : खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-४च्या पथकाने अटक केली. प्रेम ऊर्फ पप्पू सतीश वाल्हेकर (वय २१, रा. मोरे श्रमिक वसाहत, म्हस्के गिरणीसमोर, कोथरूड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांच्या पथकाला आरोपी औंध रोडवरील एम.एम. हॉटेलसमोर थांबला असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार विशाल इथापे यांच्यामार्फत मिळाली.

त्यानुसार पथकाने तातडीने कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत जुन्या भांडणाच्या कारणावरून अर्थव जगताप याच्यावर १५ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास शिरोळे रोडवरील कॅफे फ्लाईंग जिप्सीजवळ लोखंडी हत्याराने हल्ला केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला पुढील तपासासाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, सहायक पोलीस फौजदार एकनाथ जोशी, पोलीस हवालदार विशाल इथापे, सुभाष आव्हाड, नितीन साबळे, अनिकेत भोसले, जहांगिर पठाण, शरद झांजरे आणि रोहिणी पांढरकर यांच्या पथकाने केली.



