सर्पमित्राच्या तत्परतेने टळला अनर्थ…
अक्षराज : पुनम परदेशी
दि.०३, सोयगाव (छ.संभाजीनगर) : सोयगाव शहरातील जुन्या बाजार चौकात व परिसरात राहणारे अतुल भोई यांच्या घरात मंगळवार दि.०२ रोजी रात्री भला मोठा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा घरात अचानक अजगर दिसताच कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी शेंदुर्णी येथील सर्पमित्र कृष्ण धनगर यांच्याशी संपर्क साधला. रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास फोनवरून माहिती मिळाल्यानंतर कृष्ण धनगर यांनी तत्काळ सोयगावकडे धाव घेतली.

अवघ्या काही वेळात घटनास्थळी पोहोचून त्यांनी अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने अजगराला पकडले. अजगराला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात, जंगल परिसरात सोडण्यात आले. सर्पमित्राच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या प्रसंगी नागरिकांनी सर्पमित्र कृष्ण धनगर यांच्या धाडसी आणि समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.



