भंडार्लीचा ५० वा सुवर्ण महोत्सव ‘एक गाव एक गणपती’मुळे ठरला राज्यात आदर्श

Spread the love

गावाने दाखवली एकजुटीची ताकद !
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२४, भंडार्ली (ठाणे) :
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, भंडार्ली (स्थापना १९७७) यंदा ५० व्या सुवर्ण महोत्सवी वर्षात दिमाखात पदार्पण करत असून “एक गाव एक गणपती” या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा उत्सव गेल्या ५० वर्षांपासून अखंडपणे एकाच मंडपात साजरा होतो आहे. पूर्वजांनी रचून दिलेला पाया, त्यावर आज नवीन पिढी कळस चढवण्याचे काम करत आहे, हेच या सुवर्ण महोत्सवाचे खरे वैशिष्ट्य आहे.

सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाला अलोट गर्दी

२३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला. या मंडळाला भेट देण्यासाठी अनेक राजकीय लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि भाविकांचे सन्मानचिन्ह, उपरणे, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

दिवसातून तीन वेळा आरती, संपूर्ण गाव एकत्र

गणपती बाप्पाचे विराजमान झाल्यापासून ते विसर्जन होईपर्यंत संपूर्ण गाव आरतीसाठी एकत्र येत असते. दररोज तीन वेळा आरती केली जाते – सकाळी ९ वाजता, संध्याकाळी ७ वाजता आणि रात्री १२ वाजता. लहानांपासून थोरांपर्यंत सर्व ग्रामस्थ या आरतीला हजर असतात.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

आरती व्यतिरिक्त दररोज मंडपात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये दररोज भजन, देवींची गाणी, हरिपाठ, बाल्या नाच, संगीत खुर्ची, प्रबोधनपर व्याख्याने असे कार्यक्रम होतात, ज्यामुळे गावातील तरुण आणि लहान मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असते.

विसर्जन सोहळा ठरतो आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र येत असते. नाचत-गाजत, गुलाल उधळीत, फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करीत गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक येतात.

‘एक गाव एक गणपती’मुळे भंडार्लीला झालेले ५ मोठे फायदे:

१. गावात एकता आणि बंधुभाव वाढतो: वेगवेगळ्या मंडळांमुळे होणारे वाद, भांडणे पूर्णपणे थांबली आहेत. सर्व ग्रामस्थ एकाच मंडपात एकत्र येतात, त्यामुळे एकोपा वाढला आहे.
२. लाखो रुपयांची आर्थिक बचत व विकासाला निधी: प्रत्येक मंडळाच्या वेगळ्या खर्चाऐवजी एकच उत्सव केल्याने लाखो रुपयांची बचत होते. हा वाचलेला निधी गावातील शाळा, मंदिर, रस्ते, पाणी योजना अशा विकासकामांसाठी वापरला जातो.
३. पर्यावरणाचे रक्षण आणि ध्वनी प्रदूषणाला आळा: एकच मूर्ती आणि एकच विसर्जन मिरवणूक असल्याने निर्माल्य कमी होते, तसेच डीजे आणि लाऊडस्पीकरच्या अतिवापरामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला आपोआप आळा बसतो.
४. कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत: एकच मिरवणूक आणि एकच मंडप असल्याने पोलिस प्रशासनावरील ताण कमी होतो, वाहतूक आणि गर्दीचे नियोजन सोपे होते.
५. राजकारण विरहित व भेदभाव विरहित उत्सव: गटबाजी, पक्षबाजी आणि भेदभाव विसरून संपूर्ण गाव राजकारण विरहित उत्सव साजरा करते. गणपती हा फक्त आणि फक्त गावाचा असतो, कोणत्याही एका गटाचा नाही.

अशा या आदर्श आणि एकतेचा संदेश देणाऱ्या भंडार्ली गावाच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!