३०० मिमी मुख्य जलवाहिनीवरील ६१ अवैध मोटारी जप्त, बेकायदा जोडण्या खंडित
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२४, दिवा (ठाणे) : दि. २३ सप्टेंबर रोजी दिवा गाव आणि दिवा पश्चिम परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या ३०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर सुरू असलेल्या पाणी चोरीवर अखेर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धडक कारवाई केली. या मोठ्या कारवाईत पाणी खेचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तब्बल ६१ अवैध मोटारी (वॉटर पंप मशीन) जप्त करण्यात आल्या असून सर्व अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
नगरसेवक ऍड. आदेश भगत यांच्या निवेदन आणि पाठपुराव्याला यश
दिवा प्रभाग क्रमांक २७ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याची लेखी तक्रार नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी दिवा प्रभाग समितीच्या पाणी विभागाकडे केली होती. पाणी चोरी होत असलेल्या विविध ठिकाणांचा सविस्तर उल्लेख करून तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आणि बुधवारी ही कारवाई करण्यात आली.

उपअभियंता सुरेश वाघीरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
ही संपूर्ण कारवाई ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश वाघीरे यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिकेचे अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित पथकाने साबेगाव रोडवरील सिद्धार्थ पार्क उर्फ सिद्धांत पार्क सोसायटीच्या मागील परिसरात, साईबाबा मंदिराच्या मागील बाजूस तसेच रेशनिंग कार्यालयाजवळ ही धडक कारवाई केली.
या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर बेकायदा कनेक्शन करून मोठ्या क्षमतेच्या मोटारीने पाणी खेचले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी या पंपांसाठी स्वतंत्र खोलीदेखील उभारण्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून सोसायट्यांची लूट
दिवा परिसरात पाणी मुबलक उपलब्ध असतानाही अनधिकृत जोडण्या आणि पंपांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी खेचले जात असल्याने दिवा गावात अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. अनधिकृतरीत्या पाणी खेचून सोसायट्यांना विकण्याचा धंदा सुरू असून रोज पाणी हवे असल्यास १२ हजार रुपये, तर एक दिवसाआड पाणी हवे असल्यास ६ हजार रुपये उकळले जात असल्याच्या तक्रारी ऍड. भगत यांच्याकडे आल्या आहेत.
नागरिकांना आवाहन
“कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या जोडण्यांवर कारवाई आवश्यक आहे. नागरिकांनी अधिकृत जलवाहिनीसाठी दिवा प्रभाग समितीतील पाणी विभागाशी किंवा नगरसेवक कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन ऍड. आदेश भगत यांनी केले.
शहरातील इतर मुख्य जलवाहिन्यांवरील अनधिकृत जोडण्यांविरोधात अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



