गणेश विसर्जनापूर्वी फेरीवाले हटवा; भाजपचे सचिन भोईर यांची तंबी

Spread the love

अक्षराजच्या बातमीचा इम्पॅक्ट, अखेर २५ हातगाड्यांवर JCB च्या सहाय्याने धडक कारवाई
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२२, दिवा (ठाणे) :
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दिवा-साबे रोड, दिवा-शील रोड आणि दिवा-आगासन रोडवर फेरीवाले, हातगाड्या, भंगार गोदामे, गॅरेज, वजन काटे व हॉटेलांच्या बेकायदा पार्किंगमुळे २-३ तास वाहतूक कोंडी व नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची बातमी दैनिक अक्षराजने प्रसिद्ध केली होती. हॉटेलांना पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावरच लावून ग्राहक तासन्तास बसतात, गॅरेजसमोर रस्त्यावरच दुरुस्ती व वजन काट्यांवर रांगा लागतात.

या संदर्भात भाजप दिवा मंडळ अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन (आवक क्र. ३३४२) मागणी केली होती की, विसर्जन मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी होणार आहेत, त्यामुळे मुख्य मार्गांवरील फेरीवाले तातडीने हटवून रस्ते मोकळे करावेत व विसर्जन पूर्ण होईपर्यंत पुन्हा बसणार नाहीत याची दक्षता घ्यावी. “गणरायाला मोकळा मार्ग आणि दिवेकरांना सुरक्षित रस्ता मिळालाच पाहिजे, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला होता. स्थानिक नागरिक व दररोज ये-जा करणाऱ्या वाहन चालकांनीही या मागणीला पाठिंबा देत शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा सर्व नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला होता.

अखेर कारवाई – दैनिक अक्षराजच्या बातमीचा इम्पॅक्ट

या बातमीची व सचिन भोईर यांच्या मागणीची दखल घेत आज दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर सहाय्यक आयुक्तांच्या अतिक्रमण पथकाने JCB च्या सहाय्याने एकूण २५ हातगाड्यांवर धडक कारवाई करून रस्ता मोकळा केला. यामुळे वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली आहे.

नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत उर्वरित भंगार गोदामे, गॅरेज, वजन काटे व हॉटेल पार्किंगवरही कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!