‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी पुढाकार घ्या; पालकांना आरोग्य विभागाचे आवाहन
अक्षराज : जे. के. पोळ
दि.१५, ठाणे : जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींना भविष्यातील गर्भाशय मुख कर्करोग आजारापासून संरक्षण मिळावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. १४ वर्षे पूर्ण झालेल्या व १५ वर्षे पूर्ण न झालेल्या सर्व मुलींना ही लस शासनामार्फत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली असून, पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा दुसऱ्या क्रमांकाचा गंभीर आजार मानला जातो. सन २०२४ च्या ICMR-NCRP अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे ७८ हजारांहून अधिक महिलांना या आजाराचे निदान होते, तर ४२ हजारांपेक्षा अधिक महिलांचा मृत्यू होतो. ‘एचपीव्ही’ लसीकरणामुळे या कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूपासून संरक्षण मिळून भविष्यातील धोका मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, ‘एचपीव्ही’ लस पूर्णपणे सुरक्षित आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आहे. ही लस सन २००६ पासून जगभरात वापरली जात असून ५० कोटींहून अधिक महिलांनी ती घेतली आहे. महाराष्ट्र राज्यातही हजारो मुलींना लसीकरण करण्यात आले असून कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत.
दैनिक अक्षराज १५ मे २०२६ मुख्य आवृत्ती
पेपर येथे वाचा व फॉरवर्ड करून सहकार्य करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://epaper.aksharaj.in/view/544/dainik-aksharaj-15-may-2026
जागतिक आरोग्य संघटनेनुसार या लसीचा प्रजननक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तसेच भारत सरकारकडून दिली जाणारी ‘क्वाड्रीव्हॅलंट एचपीव्ही’ लस एकच डोस देऊन प्रभावी संरक्षण प्रदान करते. मुलगी मासिक पाळीत असली तरीही ही लस सुरक्षितपणे दिली जाऊ शकते, असे आरोग्य विभागाने नमूद केले आहे. जिल्ह्यातील शाळा, आरोग्य केंद्रे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, प्रत्येक पात्र मुलीपर्यंत ही लस पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
“आपल्या मुलीचे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. भविष्यातील गंभीर आजारांपासून संरक्षणासाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे,” असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.



