ठाणे-नवी मुंबईच्या हद्दीतील गोठेघरमध्ये पुन्हा आगीचा भडका; अनधिकृत गोदामांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२८, गोठेघर (ठाणे) :
ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या बॉर्डरवर असलेल्या गोठेघर परिसरातील हंमदान पार्क, बंटी हॉटेलच्या बाजूला असलेल्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या खुर्च्या असल्याची माहिती समोर येत असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

वारंवार आग लागण्याच्या घटनांनी नागरिक हैराण :
ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी कल्याण फाटा येथे वन खात्याच्या विभागाच्या बाजूला असलेल्या टायरच्या गोदामाला पावसाळ्यात लागलेली आग सलग सात दिवस धगधगत होती. त्याचप्रमाणे खान कंपाऊंड, कल्याण फाटा, आचार गल्ली, भोईर कंपाऊंड, भट्टी गल्ली, उत्तर शिव, दहिसर मोरी,भांडार्ली, दहिसर, दहिसर ठाकूर पाडा, पिंपरी शील फाटा संपूर्ण परिसर या भागांमध्ये सातत्याने आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
प्रदूषण आणि आरोग्याला गंभीर धोका :
या अनधिकृत गोदामांमध्ये केमिकलयुक्त रसायने, प्लास्टिक, स्फोटक पदार्थ, गॅस सिलेंडर, भंगार आणि इतर घातक पदार्थ मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले जातात.
१. प्लास्टिक आणि टायर जळाल्याने निघणारा काळा धूर हा अत्यंत विषारी असतो. यातून कार्बन मोनॉक्साईड, डायऑक्सिन आणि PM2.5 सारखे घातक वायू हवेत मिसळतात.
२. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दम्याच्या रुग्णांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ, त्वचारोग आणि भविष्यात कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचा धोका आहे.
३. ही गोदामे दाट नागरी वस्तीमध्ये असल्याने आणि त्यांना अग्निसुरक्षा विभागाचा NOC नसल्याने एखादी मोठी स्फोटाची घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे.
४. केमिकलचे पाणी जमिनीत मुरल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित होत आहेत.

प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल :
अनधिकृत गोदामे कोणाच्या आशीर्वादाने उभी राहत आहेत? कोण त्यांना अभय देत आहे आणि कोण त्यांच्याकडून हफ्ते गोळा करत आहे? जर ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका हफ्ते घेत नसेल, तर मग कारवाई का करत नाही? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
एखादी मोठी दुर्घटना घडून निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का? दोन्ही महानगरपालिकांनी तातडीने या परिसरातील सर्व अनधिकृत आणि धोकादायक गोदामांचे सुरक्षा ऑडिट करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



