रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचली नाही, मुलीला जन्म दिल्यानंतर मातेचा मृत्यू 

Spread the love

रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचली नाही, मुलीला जन्म दिल्यानंतर मातेचा मृत्यू 

अक्षराज : वसंत वडस्कर

दि. १७, जिवती (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील घोडणकप्पी या दुर्गम गावात रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला वेळेत वैद्यकीय मदत मिळू न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संगीता गेडाम (वय २५) यांनी घरातच मुलीला जन्म दिला. यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

       जिवती तालुक्यातील घोडणकप्पी हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. रविवारी पहाटे संगीता गेडाम यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्याने शासकीय रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही. रुग्णवाहिकेला मुख्य रस्त्यावरच थांबावे लागले.

       संगीता यांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत त्यांना डोंगर उतरवून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसूती वेदना तीव्र झाल्याने त्यांना पुन्हा घरी आणण्यात आले. अखेर घरातच त्यांची प्रसूती झाली आणि त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. कुटुंबीय मुलीच्या जन्मामुळे आनंदात असतानाच काही क्षणांत परिस्थिती बदलली. प्रसूतीनंतर संगीता यांना अतिरक्तस्राव सुरू झाला. त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आणि प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले.

       दरम्यान, प्रकृती अधिक गंभीर होत असल्याने त्यांना खासगी मालवाहू वाहनातून शंकरपठार येथे उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

        या घटनेमुळे नवजात मुलगी जन्मताच मातृछत्राला मुकली असून गेडाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकीकडे मुलीच्या जन्माचा आनंद तर दुसरीकडे आईच्या मृत्यूचे दुःख अशा दुहेरी भावनांमध्ये कुटुंबीय सापडले आहेत. घोडणकप्पीसारख्या दुर्गम गावांमध्ये अद्यापही बारमाही रस्ते, तातडीची आरोग्य सेवा आणि रुग्णवाहिका सुविधा प्रभावीपणे उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती या घटनेतून पुन्हा समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी गावाला तातडीने सर्व हंगामात वापरता येईल असा रस्ता उपलब्ध करून देण्याची तसेच आरोग्य सुविधांचा विस्तार करण्याची मागणी केली आहे. घोडणकप्पी येथील संगीता गेडाम यांनी घरातच एका मुलीला जन्म दिला. मात्र प्रसूतीनंतर झालेल्या अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जन्माच्या काही क्षणांतच नवजात कन्या आईच्या मायेपासून कायमची वंचित झाली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. विकासाच्या गप्पांमध्ये मूलभूत सुविधांअभावी ग्रामीण भागातील नागरिकांना आजही जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!