बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला जीव

Spread the love

बारा वर्षांच्या देवेंद्रला न्याय मिळणार का ? प्रशासनावर सवाल !

अक्षराज : विनोद वास्कर

दि.१०, दिवा (ठाणे) : ज्याच्या आयुष्याची सुरुवातच झाली नव्हती, त्याचा शेवट झाला. दिवा शहरात अवघ्या बारा व्या वर्षी डॉक्टरच्या चुकीमुळे देवेंद्रचा जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.काय वाटले असेल त्या माय-माऊलीला जिने नऊ महिने यातना भोगून त्याला जन्म दिला. काय वाटले असेल त्या बाळाच्या वडिलांना ज्याने त्याचा सांभाळ केला. त्याला अग्नी द्यायची वेळ अवघ्या बारा वर्षात आली. का नियतीने घात केला? कोणामुळे झाला?ताप होता म्हणून २५ मे २०२६ रोजी शास्त्री नगर, डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. तेथे ऍडमिट करून घेतले नाही. चोवीस तासांनी ताप कमी झाला नाही तर या, असे सांगितले. परत आल्यावर शेजारी असलेल्या डॉक्टरला सांगितले. त्याने औषध पाहिले. हे औषध लहान मुलांचे आहे, मी ही गोळी देतो ती घ्या आणि सकाळी ग्लुकोज लावतो असे सांगितले.

रात्र संपली, सकाळी वडील कामाला गेले. ते बारा वर्षाचे मूल स्वतः चालत डॉक्टरकडे गेले. रात्री ताप कमी झाला होता, परत आला आहे असे सांगितले. डॉक्टर शिवसेना शाखेत संजय भगत यांच्या गाळ्यात होता. डॉक्टर मुलाच्या सोबत घरी आला. ग्लुकोज लावले. त्यानंतर पंधरा मिनिटात मुलाचे हात-पाय वाकडे झाले. तोंडातून फेस आला. सर्वजण घाबरले. त्या बाळाला उचलून दिवा येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, येथे घेतले नाही. त्यांनी डोंबिवली येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितले.

बोगस डॉक्टर शिशिर रॉय !

बाळाची परिस्थिती पाहून आई बेशुद्ध पडली. शेजारचे लोक घेऊन डोंबिवली येथे गेले. वडीलही तिथे आले. मुलाची अवस्था पाहून वडिलांना झटका बसला, त्यांनाही तेथे उपचार घ्यावे लागले. बाळाची परिस्थिती वाईट होती. हॉस्पिटलवाल्यांनी पन्नास/साठ हजार बिल केले. रात्री बारा वाजता त्यांनी हे सांगितले की ब्रेन हॅमरेज झाला आहे. तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तेथून ॲम्ब्युलन्स केली. डोंबिवलीवरून के.ई.एम. मध्ये जाण्यासाठी अठरा हजार रुपये भाडे घेतले.के.ई.एम. मध्ये गेल्यावर त्यांनी सांगितले, काही जीव वाचवता येत नाही. मुलगा कोमात गेला आहे. मृत्यूशी झुंज सुरू आहे. शेवटी देवाच्या हात.

दिनांक १/०६/२०२६ रोजी रात्री नऊ वाजता मुलाची प्राणज्योत मावळली. दुसऱ्या दिवशी सकाळी दातिवली स्मशान भूमी येथे, ज्या हाताने मुलाचा सांभाळ केला, लाड केले, त्याच हाताने त्याला अग्नी दिली. देवेंद्र गेला वयाच्या बारा व्या वर्षी, पण जाताना इतरांच्या सोबत असे होऊ नये यासाठी बोगस डॉक्टर आणि मेडिकल यांच्या विरोधात आक्रोश करून गेला. झोपले प्रशासन जागे झाले. चौकशी सुरू झाली. दिवा शहरातच नाही, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांवर कार्यवाही सुरू झाली.

पालिकेच्या सिस्टरने सदर गाळ्यात दोन वेळा त्या डॉक्टरला उपचार करणे बंद करण्यास सांगितले. पण तो कोणताही बोर्ड न लावता संजय म्हात्रे यांच्या गाळ्यात क्लिनिक चालूच ठेवत होता.

तपास पथक आल्यावर श्लोक नगरचे शिवसेना शाखा प्रमुख संजय म्हात्रे आणि त्यांचे सहकारी सांगत होते, डॉक्टर चांगला होता म्हणून तो येथे बसायचा. सदर गाळ्यात चेक केल्यावर एक टेबल, खुर्ची, काही इंजेक्शन, निडल्स, औषधी मिळून आल्या. आणि त्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला.

बारा वर्षाच्या देवेंद्रचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग आली, हेच खूप मोठे दुर्दैव आहे. बोगस डॉक्टर शिशिर रॉय आणि आणखी एका डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला. माजिवडा, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा येथील जवळपास चोवीस बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल होणार आहेत. पण कधी? प्रशासनाने तत्काळ गुन्हे दाखल करून सर्वांना अटक केली पाहिजे. एवढेच नाही तर पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल यांचीही तपासणी करून कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.

पण प्रश्न हाच आहे – यासाठी सामाजिक मंडळ, पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, प्रतिष्ठान आवाज उठवणार का? त्या गरीब कुटुंबाला प्रशासन मदत करणार का? देवेंद्रच्या आई-वडिलांवर जी वेळ आली ती वेळ कोणावर येऊ नये. फक्त कागदी कार्यवाही नको, आरोपींना तत्काळ अटक करावी. देवेंद्रच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय आणि आधार हवा आहे.

प्रशासनाला एवढेच सांगणे आहे, परत कोणाचा जीव जाण्याची वाट पाहू नका. शासन-प्रशासनाने देवेंद्राच्या परिवाराला नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आणि त्या बोगस डॉक्टरची प्रॉपर्टी जप्त करून आर्थिक मदत करण्याची विनंती धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल धनराज केंद्रे यांनी केली आहे. ९ जून २०२६ रोजी व्यक्ती वैद्यकीय अधिकारी आणि औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन अमोल धनराज केंद्रे यांनी निवेदन दिले आणि कारवाईची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!