कल्याण फाटा सर्कलवर नियम धाब्यावर; वॉर्डनकडून अवजड वाहनांकडून पैशांची वसुलीचा आरोप
बंदीच्या वेळेतही अवजड वाहतूक, पार्किंगचा प्रश्न आणि बॅनरचा अभाव – प्रशासनाचे नियोजन शून्य
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२४, शिळफाटा (ठाणे) :
कल्याण फाटा सर्कल येथे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असून, काही वॉर्डन अवजड वाहनांकडून पैशांची वसुली करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. बंदीच्या वेळेतही अवजड वाहनांची सर्रास वाहतूक आणि त्यांच्यासाठी पर्यायी पार्किंग नसल्याने शिळफाटा-कल्याण फाटा मार्गावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
बंदी आहे, पण पार्किंग कुठे?
नियमांनुसार अवजड वाहनांना सकाळी ७ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत प्रवेशबंदी आहे. मात्र बंदीच्या वेळेत ही वाहने उभी करायची कुठे, यासाठी प्रशासनाकडे कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यामुळे वाहतूक चालक नियम तोडण्यास मजबूर होत आहेत. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आहे.
नियमांचा प्रचारच नाही
शहरातील चौकाचौकात अवजड वाहनांना बंदीच्या वेळा स्पष्ट करणारे बॅनर लावले नाहीत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना याची माहितीच नसते. प्रशासनाने तातडीने सर्व महत्वाच्या चौकात माहितीपर बॅनर लावेत जेणेकरून जाणीवपूर्वक नियमभंग होणार नाही.
४० कर्मचारी असूनही कोंडी का?
मुंब्रा वाहतूक विभागात टोटल कर्मचारी ४० आहेत त्यामध्ये १४ ते १५ वार्डन आहेत. एवढे मनुष्यबळ असताना सुद्धा ट्राफिक समस्या होते. यापूर्वी सुद्धा असेच प्रकार घडत होते त्यावेळी सर्व मुंब्रा वाहतूक अधिकारी आणि वॉर्डन यांची बदली करण्यात आली होती. आता पुन्हा तसंच होत आहे.
सामान्यांचे हाल
वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, नवी मुंबई ठाणे परभणी विभागाच्या बसेस सुद्धा वेळेवर पोहोचत नाहीत.
१) विद्यार्थी : शाळा-कॉलेजला उशीर होत असल्याने शैक्षणिक नुकसान. विद्यार्थ्यांचे शिक्षण बुलट जात आहे.
२) रुग्ण : रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचता येत नसल्याने उपचार वेळेवर मिळत नाही.
३) नोकरदार : उशीर झाल्याने नोकरीला मुकावे लागत आहे.
नागरिकांच्या ३ ठोस मागण्या
१) पर्यायी पार्किंग : बंदीच्या वेळेसाठी अवजड वाहनांना शहराबाहेर सुरक्षित पार्किंगची व्यवस्था करावी.
२) जनजागृती : सर्व चौकांमध्ये बंदीच्या वेळा दर्शवणारे मोठे बॅनर लावेत.
३) कठोर कारवाई : वसुली करणाऱ्या वॉर्डन आणि नियम मोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी. तसेच अशा आलसी अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची बदली झालीच पाहिजे.



