आळंदी शहरातील पथविक्रेत्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही – पुणे जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ सोनवणे
अक्षराज : प्रतिनिधी
दि.२४, आळंदी (पुणे) : आज महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दल सह महाराष्ट्र राज्य टपरी, हाथगाडी, पथारी पंचायत तसेच पथविक्रेता समिती सर्व सदस्य यांनी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले. दिनांक २३ जुलै २०२६ रोजी झाडीबाजार येथील पथविक्रेत्यांवर अचानकपणे जेसीपी घेऊन कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख आले होते. तसेच मरकळ चौकातील पात्र पथविक्रेत्यांना नोटीस दिल्यामुळे त्याच्या विरोधात आज दोन्ही संघटनेचे पदाधिकारी, पथविक्रेता समितीचे सर्व सदस्य यांनी तत्काळ आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन पथविक्रेता अधिनियम 2014 या कायद्या प्रमाणे पथविक्रेतांना न्याय द्या वारंवार कारवाई ही बेकायदेशीरपणेच केली जात आहे. पथविक्रेता समितीला विचारात घेऊनच शहरातील पथविक्रेत्यांच्या संदर्भात निर्णय घ्यावा. तसेच तत्काळ शहरातील पथविक्रेत्यांना परवाना द्यावा, जर काही कारणास्तव पथविक्रेता बाधित होत असेल तर त्याला पहिल्यांदा योग्य ठिकाणी पुनर्वसन द्यावे पुनर्वसनाची जागा निश्चित होईपर्यंत त्याला आहे. त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी कायद्यात तरतूद आहे. त्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
त्यावर मुख्याधिकारी यांनी लवकरच या सर्व विषयासंदर्भात कायद्याच्या प्रमाणे योग्य तो निर्णय घेण्यात येईल तसेच आपणा सर्वांना त्या महत्वपूर्ण मिटींगसाठी बोलवण्यात येईल. तसेच योग्य तो निर्णय होईपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. तसेच या बैठकीमध्ये नगरसेवक सुनीलभाऊ घुंडरे यांनी शिष्टमंडळाच्या बाजूने महत्वपूर्ण विषय मांडले, शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे, टपरी, हाथगाडी, पथारी पंचायत संघटनेचे गणेश मोटकर, राहुल कुऱ्हाडे, पथविक्रेता समिती सदस्य गणेश काळे, काजल धोंडगे, सुनिता ठुबे, मचक यादव, तुषार नेटके, महेश जाधव सह मल्हार काळे आणि दोन्ही संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



