देवशयनी एकादशीच्या पावन दिवशी संतोष भोईर यांची प्राणज्योत मालवली
शिळगावसह पंचक्रोशीत शोककळा !
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२५, शिळगांव (ठाणे) : देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी शिळगावचे पोलीस पाटील स्वर्गीय संतोष सुदाम भोईर यांचे प्रदीर्घ आजाराशी झुंज देत दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिळगावसह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून,समाजसेवेचा एक निस्वार्थी आधारवड काळाच्या पडद्याआड गेला आहे.
प्रेमळ, मनमिळावू आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले संतोष भोईर यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संघर्ष केला.गोरगरिबांचे प्रश्न असोत, अन्यायाविरुद्धची लढाई असो किंवा गावाच्या विकासाचा विषय असो, ते नेहमीच अग्रभागी राहिले.संकटाच्या प्रत्येक क्षणी नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे ते लोकनेते म्हणून ओळखले जात होते.
अनाधिकृत बांधकामांविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रशासनाचे लक्ष वेधले. सरकारी महसूल, गावकीची जमीन, गुरचरण क्षेत्र आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. गावाच्या हितासाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्षाची भूमिका कायम ठेवली.
टोरंट पावर कंपनीच्या वाढीव वीजबिलांपासून ते नागरिकांचा वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्यांपर्यंत प्रत्येक प्रश्नावर त्यांनी ठाम भूमिका घेतली.सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी अनेकदा प्रशासनासमोर प्रभावीपणे आवाज उठवला.
पोलीस पाटील पदासोबतच ते तालुकाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. श्री खरवली सेवा ट्रस्टचे कार्याध्यक्ष म्हणून तसेच दक्ष नागरिक संघटनामार्फत शिळगाव–कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडीसारखे महत्त्वाचे प्रश्न त्यांनी प्रशासनापुढे मांडले.
गावातील नवरात्रोत्सव, वारकरी संप्रदायाचा सप्ताह आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, न्यायनिष्ठा आणि दोन्ही बाजू समजून घेऊन निर्णय देण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वांसाठी आदर्श ठरली.
त्यांच्या निधनामुळे शिळगावने केवळ एक पोलीस पाटील गमावले नाहीत, तर जनतेचा खरा हितचिंतक, न्यायासाठी लढणारा निर्भीड आवाज आणि समाजासाठी आयुष्य अर्पण करणारा एक कर्तृत्ववान नेता गमावला आहे.
स्वर्गीय संतोष सुदाम भोईर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारावेळी सर्व स्तरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अत्यंत कठीण असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या शोकाकुल परिवाराला हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच भावपूर्ण प्रार्थना.



