खराडीतील धडक कारवाईनंतर विमाननगरच्या स्पांवर ‘कुणाचा वरदहस्त’?

Spread the love

खराडीतील धडक कारवाईनंतर विमाननगरच्या स्पांवर ‘कुणाचा वरदहस्त’?

बनावट ग्राहक पाठवून खराडी पोलिसांची मोठी कारवाई; विमाननगरमधील स्पा सेंटर्सची झाडाझडती कधी?

अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.०७, विमाननगर (पुणे) :
खराडी परिसरातील ‘फील टच स्पा’ सेंटरवर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून टाकलेल्या धाडीमुळे पुण्यातील स्पा व्यवसायातील ‘काळे धंदे’ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. या धडक कारवाईने स्थानिक पातळीवर प्रचंड खळबळ उडाली असली, तरी यामुळे आता थेट विमाननगर परिसरातील संशयास्पद स्पा सेंटर्स आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विमाननगरसारख्या अतिशय उच्चभ्रू आणि वर्दळीच्या भागात गल्लीबोळात स्पा सेंटर्सचे मोठे पेव फुटले आहे. यामध्ये ‘तंत्रा स्पा’ ऑप्टिमस बिल्डिंग, शमियाना बिल्डिंगमधील तिसरा मजला, श्री कृष्णा वेज हॉटेलच्या इमारतीमधील शेवटचा मजलाचंदेरी कॉम्प्लेक्ससमोर दुसरा मजला तसेच दत्त मंदिर वाईन्सच्या गल्लीतील पहिला मजला, रामवाडीच्या मेट्रो स्टेशन जवळ बिनधास्त सुरूअशा विविध प्रमुख ठिकाण स्पा सेंटर्स संशयास्पद रितीने सुरू असल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे.


या अवैध स्पा सेंटर्समुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, महिला व कौटुंबिक रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन आणि विमाननगर पोलीस ठाणे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप आता नागरिक उघडपणे करत आहेत. खराडी पोलिसांनी ‘फील टच स्पा’वर संशयाच्या आधारे तातडीने छापा टाकला, तर मग अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या विमाननगरमधील या स्पा सेंटर्सची नियमित तपासणी का होत नाही? तेथील अनेक स्पा सेंटरमध्ये नियमांची सर्रास पायमल्ली सुरू असल्याच्या तक्रारी असताना, प्रशासन डोळेझाक का करत आहे? हा सर्वात मोठा सवाल आहे.
विमाननगर परिसरातील सुजाण नागरिकांनी आता या प्रकाराविरोधात कमालीचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या स्पा सेंटर्सकडे वैध व्यावसायिक परवाने आहेत का? तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन झाले आहे का? खराडीत ‘फील टच स्पा’वर धाड पडते, पण विमाननगरमध्ये मात्र पूर्ण शुकशुकाट कसा? येथे नक्की कोणाचा ‘आशीर्वाद’ काम करत आहे? असे रोखठोक सवाल नागरिक विचारत आहेत.
कोणत्याही अधिकृत व्यवसायाला नागरिकांचा विरोध नाही; परंतु स्पाच्या नावाखाली सुरू असलेले अवैध प्रकार रोखण्यासाठी पोलीस व महापालिकेने तातडीने संयुक्त मोहीम राबवून पारदर्शक तपासणी केलीच पाहिजे. “केवळ कागदी घोडे न नाचवता, विमाननगरमधील प्रत्येक स्पा सेंटरची झाडाझडती घ्या आणि बेकायदेशीर कृत्य आढळल्यास मालकांवर कठोर गुन्हे दाखल करा,” अशी जोरदार मागणी रहिवासी करत आहेत. आता पोलीस प्रशासन जागे होऊन विमाननगरमधील ‘आशीर्वादप्राप्त’ स्पा सेंटर्सचा बुरखा टरकावणार, की हे संशयास्पद मौन असेच कायम राहणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!