दिव्यात नालेसफाईच्या नावाने लबाडी; पालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करावा
ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्योती पाटील यांची मागणी
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२३, दिवा (ठाणे) : दिवा शहरात दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाईत हलगर्जीपणा होत असून यावर्षी ही होणारी नालीसफाई ही दिखाव्यासाठी केली जात असून नाल्यातील खोलवरील गाळ प्रत्यक्ष काढला जात नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी केला आहे. पालिका आयुक्तांनी दिवा शहरातील नालेसफाईचा प्रत्यक्ष पाणी दौरा करावा अशी मागणीच त्यांनी या निमित्ताने केली आहे.

दिवा शहरात दरवर्षी नालेसफाई नीट न झाल्याने अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचते. त्याचबरोबर रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आधीच दिवा शहरात अरुंदनाले असून नाल्यांच्या ठिकाणीच वस्ती दाटी-वाटीने वसलेले आहे त्यात नालेसफाई नीट होत नसल्याने नागरिकांना आगामी पावसाळ्यात याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अंतर्गत नाले साफ न केले गेल्याने बैठ्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना पावसाळ्यात समस्यांचा सामना करावा लागतो.ही परिस्थिती लक्षात घेऊन दिवा शहरातील सर्व महत्त्वाचे नाले हे पूर्णपणे साफ करणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेचे संबंधित ठेकेदार हलगर्जीपणा करत असून वरवरचा कचरा काढून आतील गाळ काढण्यास चालढकल केली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला संघटिका ज्योती पाटील यांनी केला आहे.त्याचबरोबर ज्या ठिकाणी वरवरचा प्लास्टिक कचरा काढून ठेवण्यात आला आहे,तो उचलला न गेल्याने पावसामुळे हा कचरा पुन्हा त्याच नाल्यात जाण्याची शक्यता आहे.

एकंदरी दिव्यातील नालेसफाई मध्ये पालिका अधिकारी व संबंधित ठेकेदार यांना नागरिकांच्या समस्यांशी देणं घेणं नाही अशीच परिस्थिती असल्याने दिवा शहरातील संपूर्ण नालेसफाईचा प्रत्यक्ष पाहणी दौरा पालिका आयुक्त यांनी करावा व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना या दौऱ्यात सहभागी करून घ्यावे अशी मागणी या निमित्ताने ज्योती पाटील यांनी केली आहे. पालिका आयुक्तांच्या दौऱ्यामुळे दिव्यात होणाऱ्या नालेसफाईच्या हातसफाईकडे पालिक आयुक्तांचे लक्ष वेधता येईल असे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे.
