नवी मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर !

Spread the love

नवी मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर..

अक्षराज : जे. के. पोळ 

दि.१५, नवी मुंबई : नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आत्ता सुखकर होणार असून, सिडकोच्या अखत्यारीतील स्थानके येत्या ६ महिन्यात मध्य रेल्वेकडे होणार हस्तांतरित करण्यात येणार आहेत. सिडको प्रशासन अधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा काढण्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दोन्ही प्राधिकरणे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने रेल्वे प्रवासी मात्र यात भरडला जात होता. खासदार नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दखल घेत दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणत आज नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज स्थानक येथील मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन येत्या ६ महिन्यात सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरण, पावसाळापूर्व कामे, दैनंदिन कामे करण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केल्याने आता नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. नवी मुंबई परिसरातील  रेल्वे स्थानकांच्या दुरवस्थेबाबत आणि तेथील अपुऱ्या प्रवासी सुविधांबाबत खासदार म्हणून नरेश म्हस्के यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रवाशांच्या सतत तक्रारी प्राप्त होत होत्या. या समस्यांची दखल खासदार नरेश म्हस्के घेतली होती. ‘रेल्वे सल्लागार समिती’ चे सदस्य या नात्याने समितीच्या दिल्ली येथे होणाऱ्या बैठकांमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी हा विषय वारंवार मांडला. स्थानकांची झालेली पडझड, देखभालीचा अभाव आणि सुरक्षेचा प्रश्न यामुळे सामान्य प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच वाशी ते बेलापूर आणि खारघर ते खांदेश्वर या स्थानकांसाठीचे देखभाल करार अनुक्रमे २००३ आणि २००८ मध्ये संपले आहेत.

त्यानंतर कोणताही नवा करार झालेला नाही. तर धक्कादायक बाब म्हणजे ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी आजतागायत एकही देखभाल करार करण्यात आलेला नाही. या गोष्टी खासदार नरेश म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर याची गंभीर दखल घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले.  नवी मुंबई परिसरातील रेल्वे कॉरिडॉरवरील स्थानकांचे व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी, सिडकोच्या अखत्यारीतील स्थानके अधिकृतपणे मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी आजच्या बैठकीच्या पारंभी व्यक्त केली.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, हायवेचे ६- लेनिंग आणि आगामी नव्याने होणारी मुंबई यांसारख्या विविध प्रकल्पांमुळे नवी मुंबईचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. या सर्व प्रकल्पांमुळे विद्यमान रेल्वे पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येणार आहे. त्यामुळे तातडीने सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके (मानखुर्द-बेलापूर, ठाणे-तुर्भे-वाशी-नेरुळ, नेरुळ-उरण मार्ग) अधिकृतपणे मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात यावी, देखभाल आणि दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावीत, ‘अमृत भारत’ योजनेअंतर्गत नवी मुंबईतील स्थानकांचे नूतनीकरण करुन कायापालट करावा, रेल्वे स्थानकांतील बंद असलेल्या तिकीट बुकिंग खिडक्या उघडाव्यात, रबाळे, दिघा, ऐरोली स्थानक परिसरातील भुयारी मार्ग, फूट ओव्हर ब्रिजचे काम सुरु करावे, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली. पंतप्रधान आणि माननीय रेल्वे मंत्र्यांनी भारतीय रेल्वेला देशाच्या विकासाचे इंजिन बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. मात्र, या प्रलंबित मुद्यांमुळे नवी मुंबईतील आणि विशेषत: माझ्या मतदारसंघातील प्रवाशांना सध्या त्रास सहन करावा लागत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या मागण्या व सूचना यांनुसार स्थानके हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया येत्या ६ महिन्यात पूर्ण करण्याचे मान्य केले. तसेच पावसाळापूर्व सर्व कामे आणि दैनंदिन कामे मध्ये रेल्वे प्रशासन करेल असे लेखी पत्र येत्या आठवड्यात देण्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी मान्य केले.

दैनिक अक्षराज १६ मे २०२६ मुख्य आवृत्ती
पेपर येथे वाचा व फॉरवर्ड करून सहकार्य करा..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://epaper.aksharaj.in/view/545/dainik-aksharaj-16-may-2026

बैठकीला सिडकोच्या वतीने जीएमडी डॉ. राजा दयानिधी आणि इतर अधिकारी, मध्य रेल्वेचे वरिष्ठ प्रिन्सिपल चीफ इंजिनिअर रजनीश माथूर, चीफ इंजिनिअर नवीन पाटील आदी अधिकारी, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नगरसेवक अनिकेत म्हात्रे, भावेश पाटील, ज्ञानेश्वर जाधव, दिनेश जाधव आणि शिवसैनिक उपस्थितीत होते.  गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई प्रवाशांना प्रचंड त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत होता. आरोप प्रत्यारोप होत होते. मात्र खासदार म्हणून निवडून आल्यापासून नरेश म्हस्के यांनी या गंभीर प्रश्नाच्या मुळाशी जाऊन पाठपुरावा केला, अशी भावना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपण केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. अश्विनी वैष्णव यांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रवाशांच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचे आभार मानले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!