भारतभूमीच्या संरक्षणासाठी मुंबईत होणार ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

Spread the love

भारतभूमीच्या संरक्षणासाठी मुंबईत होणार “श्री राजमातंगी महायज्ञ”

गेल्या काही वर्षांत जगभरात कुठेनाकुठे लहान मोठी युद्ध अविरत सुरु आहेत. इस्त्रायल आणि हमास यांमधील युद्धात अपरिमित वित्त आणि जीवित हानी झाली. रशिया आणि युक्रेन युद्धानेही जगाची आर्थिक गणिते बदलली.  पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतालाही ऑपरेशन सिंदूर घडवावे लागले.  इराण, अमेरिका यांमधील वाद तर विकोपाला पोहोचला होता, ज्याचे पर्यावसान एकमेकांवरील विध्वंसक हल्यांमध्ये झाले.  या वादाचा फटका भारतालाही मोठ्या प्रमाणात बसला. शेअरबाजार कोलमडला, भारतातील जीवनावश्यक वस्तूंचे दर कडाडले. स्वयंपाकाच्या गॅसचा तुडवडा आजही भरून निघालेला नाही. इराण आणि अमेरिका यांतील  वाद इतका विकोपाला गेला होता कि आज ना उद्या तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटणार अशीच काहीशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. आज जरी दोन्ही देश शांत असले तरी भविष्यात कोणती परिस्थिती उद्भवेल याचा नेम नाही. ‘युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही’ असे तत्वज्ञान सांगत असले, तरी हजारो वर्षांपासून केवळ भारतातच नव्हे तर जगभरात युद्धाची परंपरा चालत आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात लाखोंचा बळी गेला. वित्तहानीची तर मोजदादच नाही. तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर असणार आहे कि आधीची दोन युद्धे खेळण्याप्रमाणे वाटतील असे भविष्य त्रिकालज्ञानी संतांनी, भविष्यवेत्त्यांनी यापूर्वीच लिहून ठेवले आहे. भारतभूमी ही भगवंताच्या अवतारांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि साधू संतांच्या मार्गदर्शनाने प्रगल्भ झालेली भूमी असली तरी येणाऱ्या काळात भारतालाही युद्धाचे चटके सोसावे लागतील यात शंका नाही. येणाऱ्या काळात भारतावर युद्ध लादले गेलेच तर अशा परिस्थितीत तपोभूमी भारताभोवती संरक्षकवच निर्माण व्हावे आणि भारताची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत श्री राजमातंगी यज्ञाचे आयोजन करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच वाचनात आले.                  

कोणत्याही युद्धाच्या आरंभी यज्ञ करून देवी देवतांना आवाहन करणे, त्यांचे कृपाशिर्वाद मिळवणे, युद्धासाठी त्यांचे सूक्ष्म रूपाने साहाय्य मिळवणे ही प्रथा भारतात पूर्वापार चालत आलेली आहे. पौराणीक कथांतून आपण याबाबत वाचले आहे, दूरदर्शनवरील रामायण-महाभारत यासांरख्या मालिकांतून आपण पाहिले आहे.  राजमातंगी ही विजयप्रदा असल्याने सध्याच्या परिस्थितीला अनुसरून श्रीराजमातंगी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.  आदिशक्ति देवी सतीची कथा आपणा सर्वांना माहीतच आहे. भगवान महादेवांवरील मालिकांतून आपण ती पहिली आहे. देवी सतीच्या क्रोधातून निर्माण झालेली शक्तीची १० रूपे ज्यांना ‘दशमहाविद्या’ असे  म्हटले जाते. ‘काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला’ अशा या दशमहाविद्या आहेत. त्यांतील मातंगी ही ‘वाणी’ आणि ‘ज्ञान’ यांच्याशी संबंधित देवता आहे. मातंगी आदिशक्तीची प्रधानमंत्री (सल्लागार) असल्याने तिला ‘श्री राजमातंगी’ असे म्हटले जाते. या देवीच्या उपासनेने शत्रूवर नियंत्रण प्राप्त होत असल्याने सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत तपोभूमी भारताचे रक्षण होण्यासाठी श्री राजमातंगीदेवीचे संरक्षककवच आवश्यक आहे. श्रीविष्णूच्या विविध दशावतारांच्या वेळीही दशमहाविद्या कार्यरत होत्या. त्रेतायुगात श्रीरामाच्या अवताराच्या वेळी श्री राजमातंगीदेवीचे तत्त्व कार्यरत होते; म्हणून आदर्श रामराज्य स्थापन झाले. सद्य:स्थितीत भारतातही अनाचार वाढला आहे, अनेक प्रकारची संकटे आ वासून उभी आहेत या सर्वांतून भारताचे रक्षण व्हावे, भविष्यात भारतावर युद्धसंकट ओढावलेच तर भारतभूमीचे सर्वतोपरी रक्षण व्हावे आणि भारतात पुन्हा एकदा लोकल्याणकारी रामराज्य स्थापन व्हावे यासाठी श्रीराजमातंगीदेवीची कृपा आवश्यक आहे.  श्री राजमातंगदेवीला ‘मंत्रिणी’ म्हटले जाते.

यज्ञाद्वारे निर्माण होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता धैर्याने उभे रहाण्याची शक्ती यातून मिळते. प्राचीन काळापासून राजे-महाराजे युद्धाला जाण्यापूर्वी यज्ञ करत असत.  मुंबईत येत्या रविवारी म्हणजेच १७ मेला मुंबईतील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मागे नर्दुल्ला टॅंक मैदानात भव्य स्वरूपात श्रीराजमातंगी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून हजारो भाविक आणि भक्तगण या यज्ञाला उपस्थित राहणार आहेत. विविध साधू संतांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी साडेतीन ते साडेसात या वेळेत हा यज्ञ संपन्न होणार आहे.  या महायज्ञाचा प्रारंभ श्री गणेशाचे आवाहन करून, पुण्याहवाचन करून आणि महासंकल्प करून करण्यात येणार आहे. त्यानंतर श्री राजमातंगीदेवीच्या मूलमंत्राचे पारायण करत द्रव्यांची आहुती देण्यात येणार आहे. महापूर्णाहुती आणि सामूहिक प्रार्थना करून यज्ञाची सांगता होईल. या वेळी श्री राजमातंगीदेवीची स्तुती करून भारताचा सर्वांगीण विकास अणि रक्षण यांसाठी सामूहिक प्रार्थना घेण्यात येणार आहे. नावनोंदणी करून या यज्ञाला अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सनातन संस्थेने केले आहे. 

जगन घाणेकर,घाटकोपर/मुंबई मो. ९६६४५५९७८०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!