२२ दिवसांनंतरही शिळ-डायघर पोलीस सुस्त ?
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२४,शिळगांव (ठाणे) : शिळ गावातील स्थानिक रहिवासी आणि नवी मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून प्रामाणिकपणे काम करणारे रघुनाथ गुणाजी पाटील यांना ATM मध्ये कार्ड बदलून ४० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या घटनेला २२ दिवस उलटूनही शिळ-डायघर पोलिसांना आरोपीचा शोध लागलेला नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

कष्टाचा पैसा काही मिनिटांत लुटला…
रघुनाथ पाटील हे शिळ गावचे मूळ रहिवासी असून नवी मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. दि. ०२/०८/२०२६ रोजी दुपारी २ वाजता ते शिळगाव येथील जी.पी. पारसिक बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.
कार्ड मशीनमध्ये रीड होत नसताना मागे उभ्या असलेल्या भामट्याने “सर्व्हर डाऊन आहे, कार्ड काढून पुन्हा टाका” असे सांगून त्यांच्या हातातून कार्ड घेतले आणि बोलण्यात गुंतवून ठेवून दुसरेच कार्ड त्यांच्या हातात दिले.

काही वेळातच त्यांच्या खात्यातून ४ वेळा, प्रत्येकी १० हजार प्रमाणे एकूण ४०,००० हजार रुपये काढण्यात आले. कष्टाने कमावलेला पैसा डोळ्यादेखत लुटला गेल्याने पाटील कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.
या प्रकरणी त्यांनी दि. ०३/०८/२०२६ रोजी शिळ-डायघर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली आहे.
ही एकटी घटना नाही… याच परिसरात गंगाबाई आलिमकर आणि दिलीप भोईर यांची सुद्धा याच पद्धतीने लूट झाली आहे. ही एक संघटित टोळी असून गरीब आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
२२ दिवस झाले, पोलीस नक्की करतात तरी काय?
घटना घडून २२ दिवस झाले तरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून CCTV फुटेज तपासणे किंवा ज्या ATM मधून पैसे काढले त्या ATM चा शोध घेणे यासारखी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे “शिळ-डायघर पोलीस स्टेशन नक्की करते काय? गुन्हेगार शोधणार कधी?” असा सवाल शिळ गावातील ग्रामस्थ विचारत आहेत.
एका सफाई कामगाराच्या कष्टाच्या पैशाला न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून आरोपींना अटक करावी, अशी मागणी होत आहे.



